Virat Kohli vs Sourav Ganguly : भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सौरव गांगुली विरुद्ध विराट कोहली असा वाद सुरू झाला आहे. विराट कोहलीला ट्वेंटी-२० कर्णधारपद सोडू नको, असे मी स्वतः फोन करून विनंती केल्याचा BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा दावा कसोटी संघाच्या कर्णधारानं दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी खोडून काढला. माझ्याशी BCCI किंवा कुणीच ट्वेंटी-२० कर्णधारपदावरून चर्चा केली नसल्याचे विराटचे वक्तव्य 'दादा'ला खोटारडे ठरवणारे ठरले. त्यानंतर २४ तासानंतर गांगुलीनं यावर प्रतिक्रिया देताना, माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही, BCCI हे प्रकरण योग्यरितिनं हाताळेल, असे म्हटले. आता पुढे काय होतंय याची सर्वांना उत्सुकता आहे.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली यानं गुडगाव येथे एका कार्यक्रमात विराट कोहलीबद्दल विधान केलं. त्यानं विराटचा अॅटीट्यूड आवडतो, परंतु तो खूप भांडतो, असेही म्हटले. गांगुली म्हणाला, ''मला विराट कोहलीचा अॅटीट्यूड आवडतो, परंतु तो खूप भांडतो.'' पुढे त्याला मानसिक ताण कसा हाताळतो हा प्रश्न विचारला गेला, त्यावर गांगुलीनं मजेशीर उत्तर दिलं. ''आयुष्यात तणाव नाही. फक्त बायको आणि गर्लफ्रेंड याच तणाव देतात.''
याआधी गांगुलीनं टीम इंडियाच्या वन डे संघासाठी रोहित योग्य पर्याय असल्याचे मत व्यक्त केले होते. ''कर्णधार म्हणून रोहितनं जे काही यश मिळवलेय, त्यानंतर वन डे संघाचे कर्णधारपदाचा तो खरा हकदार आहे. मुंबई इंडियन्ससाठी पाच, डेक्कन चार्जर्सकडून एक जेतेपद हे यशच सर्व काही सांगून जातं. जेव्हा विराट कोहलीनं ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्या पदासाठी रोहितच योग्य उमेदवार होता. न्यूझीलंडविरुद्धची मालिका ३-० अशी जिंकून त्यानं सुरुवात दणक्यात केली आहे. त्यामुळे या वर्षी जे वर्ल्ड कप स्पर्धेत घडलं, ते पुढील वर्षा पाहायला मिळणार नाही, अशी अपेक्षा आहे,''असे गांगुली Backstage with Boria या कार्यक्रमात म्हणाला.