Virat Kohli vs Sourav Ganguly : बीसीसीआयनं मागील वर्षी विराट कोहलीकडून वन डे संघाचे कर्णधारपद काढून घेतले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचा संघ जाहीर करताना बीसीसीआयनं रोहित शर्मा हा यापुढे ट्वेंटी-२० व वन डे संघाच कर्णधार असेल, ही घोषणा केली. त्यानंतर मोठं रामायण घडलं. आता माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी या वादात उडी मारली आहे.
ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना विराटला या निर्णयाचा विचार कर असे मी स्वतः सांगितले होते, असा दावा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यानं केला. त्यानंतर विराटनं बीसीसीआयच्या कोणत्याच अधिकाऱ्यानं माझ्याशी संवाद साधला नसल्याचे सांगितले. त्याच्या या विधानातून सौरव गांगुली आणि निवड समिती खोटी ठरली. निवड समिती प्रमुख चेतन शर्मा यांनी त्यात उडी मारताना हा वाद आणखी चिघळवला आहे. विराट कोहलीनं त्याची बाजू मांडली आणि आता सौरव गांगुलीनं त्यावर मत मांडायला हवं, असे विधान शास्त्री यांनी इंडियन एक्स्प्रेशशी बोलताना केलं.
ते म्हणाले, हे प्रकरण योग्य संवादानं हाताळता आले असते. हा वाद सार्वजनिक होण्याएवजी आपापसातील संवादातून मिटला असता तर योग्य ठरले असते. विराटनं त्याची बाजू मांडली आहे आणि आता बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत स्पष्टिकरण द्यायला हवं व आपली बाजू मांडायला हवी. कोण खरं, कोण खोटं हा प्रश्न नाही. आम्हाला खरं जाणून घ्यायचं आहे आणि ते सत्य संवादातूनच समोर येऊ शकतं. दोन्ही बाजूंनी संवाद होणं गरजेचं आहे.
विराटच्या कर्णधारपदाच्या वादावर मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा यांनी मौन सोडलं"विराटने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी संघ निवडण्याच्या बैठकीच्या वेळी कर्णधारपद सोडण्याबद्दल सांगितलं आणि सारेच चकित झाले. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांनी त्याला या निर्णयाचा पुनर्विचार करायला सांगितला होता. विराटच्या निर्णयाचा परिणाम विश्वचषक स्पर्धेतील कामगिरीवर होईल असंही मत अनेकांनी मांडलं. भारतीय क्रिकेटच्या भवितव्यासाठी तरी त्याने कर्णधारपद सोडू नये असं साऱ्यांनी त्याला सांगितलं होतं. पण त्याने तसं केलं नाही. त्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला होता", असं चेतन शर्मा यांनी सांगितलं.