नवी दिल्ली : विराट कोहलीची वन-डे संघाच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी केल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी मोठा खुलासा केला. ते म्हणाले, ‘विराटला मी टी-२० नेतृत्व सोडू नकोस, असा सल्ला दिला होता. मात्र, त्याने माझा सल्ला धुडकावला.’
कोहलीवर आयसीसीचे एकही जेतेपद न पटकावू शकलेला कर्णधार असा ठपका ठेवून कर्णधारपदावरून दूर करण्यात आले. पद सोडण्यासाठी बोर्डाने त्याला ४८ तासांचा अवधी दिला होता, अशी चर्चा असताना गांगुली यांचा खुलासा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कोहलीने टी-२० चे नेतृत्व सोडताना वर्कलोड व्यवस्थापनामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. बीसीसीआयने त्यावेळी देखील त्याच्या निर्णयाचा सन्मान राखला. एएनआयशी बोलताना गांगुली म्हणाले, ‘कोहलीकडून वन-डे नेतृत्व काढून घेण्याचा निर्णय बीसीसीआयने निवडकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर घेतला.
खरेतर बीसीसीआयने कोहलीला टी-२० चे नेतृत्व सोडू नकोस, असे बजावले होते. मात्र, तो आमच्या मताशी सहमत नव्हता. मग निवडकर्त्यांचे मत पडले की क्रिकेटमध्ये दोन वेगळे कर्णधार असायला हवे. त्यामुळे विराट हा कसोटी कर्णधारपदी कायम असेल तर रोहित हा वन-डे आणि टी-२० संघाचे नेतृत्व करेल, असा निर्णय झाला.’
विराटने टी-२० चे नेतृत्व सोडले त्यावेळी गांगुली यांनी आपल्या प्रतिक्रियेत आश्चर्य व्यक्त केले होते. त्यांच्या मते विराटचा हा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता. कोहलीचा हा निर्णय असेल तर आम्ही त्याचा सन्मान करतो. आमच्याकडून कुठलेही दडपण नव्हते. आम्ही त्याला काहीही सांगितलेले नाही. मीदेखील खेळाडू होतो आणि मी हे समजू शकतो,’ असे गांगुली यांनी स्पष्ट केले होते. गुरुवारी बीसीसीआयने ट्वीट करीत विराटच्या कामगिरीचे आभार मानले. साडेचार वर्षे कर्णधार म्हणून सेवा देणाऱ्या कोहलीचे बीसीसीआयने एका ओळीत ‘थँक यू’ म्हणून आभार मानले.