मुंबई: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत आहे. कोहलीनं टी-२० संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर बीसीसीआयनं एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरूनही त्याला दूर केलं. त्यामुळे विराट सध्या अवघड स्थितीतून जात आहे. याचवेळी माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
इंग्लंड दौऱ्यातील खराब कामगिरीनंतर विराटला मोठा मानसिक धक्का बसला होता, असं शास्त्रींनी सांगितलं. त्यावेळी रवी शास्त्री संघाचे संचालक म्हणून काम करत होते. त्यानंतर त्यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर शास्त्रींनी प्रशिक्षकपद सोडलं.
'२०१४ मध्ये विराट कोहली इंग्लंड दौऱ्यात खराब फॉर्मशी झगडत होता. त्यामुळे त्याला मानसिक धक्का बसला होता. त्याला धावांसाठी खूप संघर्ष करावा लागत होता. त्यानंतर त्याला सूर गवसला. मग विराटनं मागे वळून पाहिलं नाही,' असं शास्त्रींनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. इंग्लंड दौऱ्याच्या ५ कसोटीत विराटनं १, ८, २५, ०, ३९, २८, ०, ७, ६ आणि २० धावा केल्या होत्या.
हळूहळू कोहलीनं त्याच्या खेळात सुधारणा करण्यास सुरुवात केली. दिवसागणिक त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. या कालावधीत त्याच्यासोबत संवाद सुरू होता. आम्ही फलंदाजीच्या तंत्रातील महत्त्वाच्या पैलूंवर चर्चा केली, असं शास्त्रींनी सांगितलं. इंग्लंडनंतरच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कोहलीनं धावांची टांकसाळ उघडली. त्यानं या दौऱ्यात ८६.५० सरासरीनं ६९२ धावा केल्या. यामध्ये ४ शतकांचा समावेश होता.