विश्वविजेता कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला श्रीलंकेत मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाचा श्रीलंकेविरूद्धच्या वनडे मालिकेत २-० असा पराभव झाला. पहिला सामना बरोबरीत सुटल्यानंतर दुसरा सामना श्रीलंकेने ३२ धावांनी जिंकला होता. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी अतिशय वाईट कामगिरी केल्याने टीम इंडियाला ११० धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला. अविष्का फर्नांडोच्या ९६ धावांच्या बळावर श्रीलंकेने ७ बाद २४८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण डाव १३८ धावांतच गुंडाळला गेला. भारताचा रनमशिन विराट कोहली या दौऱ्यावर पुरता फ्लॉप ठरला. त्याची विकेट घेतल्यावर श्रीलंकन खेळाडूंनी केलेल्या जल्लोषाची चांगलीच चर्चा रंगली.
विराट कोहली हा मैदानात अतिशय आक्रमक असतो. सामना खेळताना प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना डिवचण्याचे काम तो अनेकदा करतो. तसेच समोरच्या संघाची एखादी विकेट गेली तर तो मोठ्या आवेशाने जल्लोष करतो, आनंद व्यक्त करतो. विराटच्या याच गोष्टीचा काल त्याला स्वत:लाच विकेट गमावल्यावर अनुभव घ्यावा लागला. भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती, त्यामुळे विराटकडून संयमी खेळीची अपेक्षा होती. पण तो स्वस्तात बाद झाला. दुनिथ वेल्लालागेने विराटला पायचीत केले. त्यानंतर श्रीलंकन खेळाडू सादिरा समरविक्रमा याने आवेशपूर्ण सेलिब्रेशन केले. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पाहा व्हिडीओ-
दरम्यान, रोहिच शर्माने नेहमीप्रमाणे दमदार सुरुवात केली होती. आपल्या ३५ धावांच्या खेळीत त्याने ६ चौकार आणि १ षटकार खेचला होता. पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. शुबमन गिल अवघ्या ६ धावांवर बाद झाल्याने विराटला पाचव्या ओव्हरलाच मैदानात यावे लागले. त्यामुळे विराट-रोहित जोडीकडून साऱ्यांना खूप अपेक्षा होत्या. पण रोहित झेलबाद झाला. त्यानंतर विराटवरील जबाबदारी आणखी वाढली. पण तो १८ चेंडूत ४ चौकारांसह २० धावा काढून माघारी परतला. इतर फलंदाजीनाही निराशाच केली. त्यामुळे भारताचा १९९७ नंतर पहिल्यांदाच श्रीलंकेने वनडे मालिकेत पराभव केला.