मुंबई - २०१४ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या तडकाफडकी निवृत्तीनंतर भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर आली. मागील चार वर्षांत विराटने सक्षमपणे ही जबाबदारी पेलली आणि संघाने अनेक विक्रमही नोंदवले. वयाचे पारडेही विराटच्या बाजूने आहे. त्यामुळे पुढील ६-७ वर्षे विराट भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळेल आणि विक्रमांचे अनेक शिखर सरही करेल. त्यामुळे भविष्यात भारताच्या सर्वोत्तम कर्णधारांत विराट आघाडीवर असेल, अशी भविष्यवाणी माजी कसोटीपटू वीरेंद्र सेहवागने केली आहे.
"कर्णधार असताना आपण किती सामने जिंकलो याचा विचार कोणताच कर्णधार करत नाही. कर्णधार म्हणून सातत्यपूर्ण खेळणे आणि संघाला मार्गदर्शन करणे, ही त्याची प्रमुख जबाबदारी असते. कर्णधार म्हणून विराटही कामगिरी त्याहीपेक्षा अधिक चांगली झालेली आहे आणि त्याने फलंदाजीतही बरीच सुधारणा केलेली आहे. भविष्यात भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांत विराटचेही नाव असेल. त्याबद्दल कोणतीच शंका नाही," असे मत सेहवागने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
विराटने कोणत्याही सामन्यात एक संघ कायम ठेवला नाही. त्याने सतत संघात बदल केले, परंतु त्याचा हा अनोखा विक्रम 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटीत तुटण्याची शक्यता आहे. 38 कसोटी सामन्यांत कर्णधारपद करताना विराटने कधीच एक संघ कायम ठेवला नाही. मात्र, तिसऱ्या कसोटीतील अकरा खेळाडूंसहच विराट पुढील सामन्यात खेळणार आहे.