इस्लामाबाद - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार वकार युनिसने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली येणा-या दिवसांमध्ये फलंदाजीचे सर्व रेकॉर्ड नेस्तनाभूत करत आपल्या नावे करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. वकार युनिस बोलले आहेत की, 'विराट कोहली ज्याप्रकारे आपल्या फिटनेसकडे लक्ष देतो आणि ज्या एकाग्रता आणि कुशलतेने खेळतो ते पाहता येणा-या दिवसांमध्ये फलंदाजीचे सर्व रेकॉर्ड तो आपल्या नावे करेल असं मला वाटतं'.
गतवर्षी पाकिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणा-या वकार युनिसने विराट कोहली सध्याचा सर्वोत्तम प्रतिभावान खेळाडू असल्याचं सांगितलं आहे. आपल्या वेळच्या सर्वोत्कृष्ट फलंदाजाबद्दल बोलताना वकास युनिसने सांगितलं की, 'गेल्या एक दशकात क्रिकेटमध्ये फार बदल झाले आहे. पण विराट कोहलीने ज्याप्रकारे आपल्या फिटनेसकडे लक्ष दिलं आहे तसंच स्वत:ला समर्पित केलं आहे, आणि आपल्या फलंदाजी कौशल्यात केलेला सुधार पाहता सध्या तो सर्वोत्तम आहे'. 'ज्या प्रकारे मी त्याला पाहत आहे, ते पाहतात तो फलंदाजीचे अनेक रेकॉर्ड मोडीत काढणार आहे', असं वकार युनिसने म्हटलं आहे.
क्रिकेटमधील दोन महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांची तुलना करण्यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना वकार युनिसने भारतीय फलंदाज सर्वोत्तम असल्याचं सांगितलं.
वकार युनिस बोलले की, 'मी तेंडुलकरविरोधात जास्त खेळलो आहे. त्याने आमच्याविरोधातच पदार्पण केलं होतं. मी अनेक वर्ष त्याला एक खेळाडू म्हणून पाहिलं आहे, आणि त्याच्याइतका समर्पित खेळाडू मी पाहिलेला नाही. ज्या फलंदाजांना मी गोलंदाजी केली त्यामधील तो सर्वोत्कृष्ट होता, आणि त्याच्याविरोधात खेळणं नेहमीच आव्हानात्मक होतं'. ब्रायन लाराबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की, 'ब्रायन लारा एक नैसर्गिक प्रतिभावान खेळाडू होता. जेव्हा त्याचा दिवस असायचा तेव्हा त्याच्याइतका धोकादायक खेळाडू नसायचा'.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'कर्णधार आणि प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात आपण कधीच शिस्तीच्या बाबतीत तडजोड केली नाही. मला नेहमीच वाटतं की, क्रिकेटमध्ये जोपर्यंत तुम्ही शिस्तबद्द असत नाही तोपर्यंत तुमची प्रतिभा संघासाठी काही कामाची नाही'.