नवी दिल्ली : 9 फेब्रुवारीपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंडविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. अशातच भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरने विद्यमान भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल एक मोठे विधान केले आहे. रोहित शर्मा पुढील ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेचा भाग होणार नाही. वसीम जाफरच्या मते, विराट कोहली पुढील ट्वेंटी-20 विश्वचषकात खेळू शकतो पण रोहित शर्मा अजिबात खेळणार नाही.
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही 2022 च्या ट्वेंटी-20 विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होते. या विश्वचषकात टीम इंडियाला फक्त उपांत्य फेरी गाठता आली. मात्र, या विश्वचषकापासून दोन्ही दिग्गजांनी मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये फार कमी सामने खेळले आहेत. त्याचबरोबर युवा खेळाडूंना अधिक संधी दिली जात आहे.
रोहित शर्मा पुढचा ट्वेंटी-20 विश्वचषक खेळणार नाही - वसीम जाफर वसीम जाफरच्या म्हणण्यानुसार, रोहित शर्माने शेवटचा ट्वेंटी-20 विश्वचषक खेळला असून पुढील विश्वचषकात एका युवा खेळाडूला संधी दिली जाईल. वसीम जाफरने एका यूट्यूब चॅनलवर सांगितले की, "ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेमुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना न्यूझीलंड आणि श्रीलंका ट्वेंटी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. त्यानंतर आयपीएल आणि विश्वचषक आहे. भारतीय संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत देखील जाऊ शकतो. माझ्या मते ट्वेंटी-20 हा युवा खेळाडूंचा खेळ आहे. मला वाटत नाही की रोहित शर्मा पुढचा ट्वेंटी-20 विश्वचषक खेळेल. विराट कोहली खेळू शकतो पण रोहित शर्मा नक्कीच खेळणार नाही. माझ्या मते तो आधीच 36 वर्षांचा आहे आणि म्हणूनच तो ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या पुढील आवृत्तीत भाग घेणार नाही. या कारणास्तव रोहित आणि कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे जेणेकरून ते ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी सज्ज होतील."
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"