मुंबई: आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. १५ सदस्यीय संघाची घोषणा करताना भारतीय क्रिकेट बोर्डाने (BCCI) ४ फिरकीपटू गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे. मात्र सर्वांचे लक्ष विराट कोहलीच्या (Virat Kohli) खेळीवर असणार आहे, कारण कोहलीचे मोठ्या कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले आहे. दरम्यान, विराट कोहली याच आठवड्यापासून आशिया चषकाच्या सरावास सुरूवात करण्याची शक्यता आहे. विराट सध्या खूप खराब फॉर्मचा सामना करत आहे त्यामुळे तो शानदार खेळी करून टीकाकारांची बोलती बंद करणार का हे पाहण्याजोगे असेल. मागील ३ वर्षांपासून कोहलीला एकही शतकीय खेळी करता आलेली नाही.
भारताच्या इंग्लंड दौऱ्यानंतर विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. तो वेस्टइंडिजविरूद्धच्या मालिकेत देखील भारतीय संघाचा हिस्सा नव्हता. त्यामुळे मोठ्या कालावधीनंतर विराट एका मोठ्या व्यासपीठावर खेळणार आहे. भारताचा आशिया चषकातील पहिला सामना आपला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध आहे. आशिया चषकात शानदार खेळी करून टीकाकारांना सडेतोड उत्तर देण्यासाठी विराट सज्ज झाला असून तो त्या दिशेने त्याने पाऊले उचलत आहे.
MCA च्या इंडोर अकादमीत कोहलीचा 'विराट' सराव
Insidesport.in सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली या आठवड्यापासून आशिया चषकाच्या सरावास सुरूवात करू शकतो. कोहली मुंबईतील MCA च्या इंडोर अकादमीतून आपल्या सरावाचा श्रीगणेशा करणार आहे, ही अकादमी वांद्रे कुर्ला येथे स्थित आहे. तिथेच जवळ वरळी येथे विराटचे घर देखील आहे. त्याच्या घरापासून ही अकादमी केवळ २० मिनिटांच्या अंतरावर आहे, त्यामुळेच कोहलीने सरावासाठी ही जागा निवडल्याचे बोलले जात आहे.
आशिया चषक २०२२ चे आयोजन २७ ऑगस्टपासून होणार आहे. ही स्पर्धा यूएईच्या धरतीवर पार पडणार असून ११ सप्टेंबरपर्यंत या स्पर्धेचा थरार रंगेल. पहिला सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये होईल. तर स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने असणार आहे, हा सामना २८ ऑगस्ट रोजी खेळवला जाईल.
आशिया चषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हूड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई. भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, अवेश खान.
Web Title: Virat Kohli will practice at MCA's Indoor Academy in Mumbai for Asia Cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.