याला योगायोग म्हणावा की... नियतीने दिलेली संधी ! १९३६-३७ च्या ॲशेस मालिकेत सर डॉन ब्रॅडमन यांच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झालेला. ब्रॅडमन यांच्या कर्णधारपदाखाली ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच इंग्लंड दौरा होता. पण, ब्रॅडमन यांच्यासाठी ते दु:स्वप्न ठरते की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली. ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन सामन्यांत सपाटून मार खावा लागला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ते ०-२ अशा पिछाडीवर गेले. त्यानंतर जे घडले ते कोणालाही अपेक्षित नव्हते आणि त्याच वळणावर आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच इंग्लंड दौऱ्यावर आला आहे. नॉटिंगहॅम कसोटी जिंकून भारतीय संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील आव्हान १-२ असे जिवंत राखले आहे. पण पुढे काय? ब्रॅडमन यांनी १९३६-३७ च्या ॲशेस मालिकेत जो करिष्मा करून दाखवला तो विराटला जमणार का? कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इंग्लंडमध्ये ०-२ अशा पिछाडीवरून पाच सामन्यांची मालिका जिंकण्याचा पराक्रम केवळ ऑस्ट्रेलियालाच करता आलेला आहे आणि तोही ब्रॅडमन यांच्या नेतृत्वाखाली. हीच संधी विराटसाठी चालून आलेली आहे.
ब्रिस्बेन आणि सिडनी कसोटीत पराभव पत्करल्यानंतर ब्रॅडमन यांच्या झंझावाती २७० धावांच्या खेळीने ऑस्ट्रेलियाला मेलबर्न कसोटीत विजय मिळवून दिला. विराटनेही ट्रेंट ब्रिज कसोटीत दोन्ही डावांत मिळून दोनशे धावा केल्या आणि भारताला विजय मिळवून दिला. पण ब्रॅडमन यांनी जो करिष्मा त्यावेळी केला, तो विराटला जमेल का? ०-२ अशा पिछाडीवरवरून ऑस्ट्रेलियाने मालिका १-२ अशी आणली आणि त्यानंतर मनोबल उंचावलेल्या ऑसी खेळाडूंनी मालिका ३-२ अशी खिशात घातली. कर्णधार ब्रॅडमन यांनी ॲडलेड आणि मेलबर्न कसोटीत अनुक्रमे २१२ व १६९ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.