पुणे : ‘स्टार फलंदाज विराट कोहली खराब कामगिरीतून लवकरच बाहेर निघेल आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान देईल,’ असा विश्वास आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक संजय बांगर यांनी व्यक्त केला आहे.
कोहलीने मागच्या पाच डावांत ९, ०, ०, १२ आणि १ अशी खेळी केली आहे. त्याच्या बाद होण्याच्या पद्धतीवरून तो फॉर्ममध्ये नाही, असे जाणवते. राजस्थान रॉयल्सकडून २९ धावांनी झालेल्या पराभवानंतर बांगर म्हणाले, ‘कोहलीसारख्या महान खेळाडूने वाटचालीत असे ‘बॅडपॅच’ अनुभवले आहेत. मी त्याचे जवळून विश्लेषण केले. त्याच्यात आक्रमकता आणि धैर्य असल्याने तो लवकरच खराब स्थितीतून बाहेर पडेल व मोठी खेळी करेल. आगामी सामन्यांत संघाच्या विजयात तो मोठे योगदान देईल.’
‘सरावादरम्यान काही वेगळे करीत नाही. विराट कुठलीही शिथिलता बाळगत नाही हे विराटचे वैशिष्ट्य. त्याचा दृष्टिकोन सकारात्मक असल्यामुळे या खराब कामगिरीवर लवकरच तो मात करू शकेल, असा विश्वास वाटतो,’ असे बांगर यांनी म्हटले आहे.
माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि माजी राष्ट्रीय फलंदाजी प्रशिक्षक बांगर पुढे म्हणाले, ‘संघात आघाडीची फलंदाजी आमच्या चिंतेचा विषय आहेच. नव्या चेंडूवर सुरुवातीला मोठे धक्के बसले की आम्ही सामना गमावतो. यावर तोडगा काढावा लागेल.’ आरसीबीने पाच सामने जिंकले असून चार सामने गमावले आहेत. गुणतालिकेत आरसीबी संघ पाचव्या स्थानी आहे.