बंगळुरू - आयपीएलच्या १५ वा हंगाम आता काही दिवसांवर आला आहे. त्यासाठी सर्वच संघांनी कंबर कसून तयारी केली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत आयपीएलमध्ये फार चमक दाखवू न शकलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आपल्या नव्या कर्णधाराची निवड अद्याप केलेली नाही. विराट कोहलीने १४ वा हंगाम आटोपल्यानंतर आरसीबीचे कर्णधारपद सोडले होते. दरम्यान, आरसीबीने अद्याप नवा कर्णधार न निवडल्याने पुन्हा विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर आरसीबीचे माजी खेळाडू डॅनियल व्हेटोरी यांनी सूचक विधान केले आहे.
विराट कोहलीला पुन्हा एकदा आरसीबीच्या कर्णधारपदी नियुक्त करण्यात यावे अशी मागणी क्रिकेटप्रेमींनी केली होती. मात्र आरसीबीचे माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी यांनी वेगळं मत मांडलं आहे. त्यांच्या मते कर्णधारपदासाठी फ्रँचायझी वेगळ्या पर्यायाचा शोध घेईल. ते म्हणाले की, विराट कोहली आरसीबीचा कर्णधार होणार नाही. फ्रँचायझी क्रिकेट किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदा कर्णधारपद गेल्यानंतर त्यापुढे जाणंच योग्य ठरेल, असे व्हेटोरींनी सांगितले.
दरम्यान, सध्या विराट कोहलीचा फॉर्मही तितकाचा चांगला चाललेला नाही. पण त्याच्या गुणवत्तेवर कुठलेही प्रश्न निर्माण करण्यात आलेला नाही. मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीमध्ये विराट कोहली ४५ धावा काढून त्रिफळाचित झाला होता. दरम्यान, बंगळुरूमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटीमध्ये शतक फटकावून विराट कोहली शतकांचा दुष्काळ संपुष्टात आणेल, अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.