Virat Kohli Gold Medal : २०२३ च्या विश्वचषकाची सुरूवात यजमान भारताने विजयाने केली. भारतीय संघाने सोप्या २०० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केवळ २ धावांवर तीन फलंदाज गमावले होते. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना खाते देखील उघडता आले नाही. मग अडचणीत सापडलेल्या टीम इंडियाला सावरण्याची जबाबदारी विराट कोहलीच्या खांद्यावर येऊन ठेपली. विराट आणि लोकेश राहुल यांनी शानदार भागीदारी नोंदवत टीम इंडियाच्या विजयाकडे कूच केली. या विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
दरम्यान, भारतीय संघ व्यवस्थापनाने सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला. सामना संपल्यानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये विराट कोहलीला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यादरम्यान कोहलीनेही पदक तोंडात धरून जोरदार सेलिब्रेशन केले. किंग कोहलीच्या भन्नाट सेलिब्रेशनचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणतात की, क्षेत्ररक्षणाचे प्रशिक्षक दिलीप हे पदक देतील. दिलीप यांनी इशान किशनसह श्रेयस अय्यरचा उल्लेख करत विराटला पदक दिले. दिलीप यांनी सांगितले की, हे पदक त्या खेळाडूला दिले जाईल, जो फक्त त्याचेच काम करत नाही तर इतरांना देखील प्रेरणा देतो.
विराट कोहली पदक घेण्यासाठी आला तेव्हा प्रशिक्षक दिलीप यांनी पदक बॉक्स कोहलीला दिला, त्यावर कोहलीने पदक घालायला सांगितले. यानंतर विराटला हे पदक प्रदान करण्यात आले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने ८५ धावा केल्या तर लोकेश राहुलने नाबाद ९७ धावा करून विजयी सलामी दिली. लोकेश राहुलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.