भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली ( Virat Kohli) याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या दोन कसोटीतून अचानक माघार घेतली. पहिल्या कसोटीला अवघे तीन दिवस शिल्लक असताना विराटने वैयक्तिक कारण सांगून माघार घेतली. तशी विनंती त्याने रोहित शर्मा, संघ व्यवस्थापन व बीसीसीआयकडे केली होती. बीसीसीआयनेही त्यांच्या निवेदनात विराटच्या निर्णयाचा आदर राखा आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत तर्कवितर्क लावू नका असे आवाहन सर्वांना केले होते. त्यात आयसीसीने आज एक महत्त्वाची बातमी जाहीर केली आहे.विराट कोहली हा २०२३ मधील वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराचा मानकरी ठऱला. आयसीसीने ही घोषणा केली. विराटने २०२३ हे वर्ष गाजवले आणि त्याने २७ सामन्यांत १३७७ धावा केल्या. शिवाय १ विकेट घेतली व १२ झेलही टिपले. विराटने भारतात झालेल्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमांचा पाऊस पाडला. तिसऱ्या क्रमांकावर खेळताना त्याने ११ इनिंग्जमध्ये ७६५ धावा केल्या, ज्या वर्ल्ड कपच्या एका पर्वातील सर्वोत्तम धावा ठरल्या. त्याने सचिन तेंडुलकरने २००३ मध्ये नोंदवलेला वर्ल्ड रेकॉर्ड मोडला. या स्पर्धेत त्याची धावांची सरासरी ही ९५.६२ इतकी होती. उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध झळकावेले शतक हे विश्वविक्रमी ठरले. वन डेत शतकांचे अर्धशतक साजरे करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला. २०२३ मध्ये त्याने वन डेत ६ शतकं व ८ अर्धशतकं झळकावली.
विराटने २०१२, २०१७, २०१८ व २०२३ अशी चार वेळा वन डे तील सर्वोत्तम खेळाडूची ट्रॉफी जिंकली आणि असा पराक्रम करणारा तो पहिला खेळाडू ठरला. शिवाय त्याचा हा १०वा आयसीसी पुरस्कार आहे आणि जगात एकमेव खेळाडू ज्याने एवढी पुरस्कार जिंकली आहेत.
विराट अन् आयसीसी पुरस्कार - दशकातील सर्वोत्तम खेळाडू- २०१७ व २०१८ मध्ये वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार- दशकातील सर्वोत्तम वन डे तील खेळाडू - वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार चार वेळा- २०१८ मध्ये कसोटीतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार- २०१९ मध्ये स्पिरिट ऑफ दी इयर पुरस्कार.