सेंच्युरियन : कारकिर्दीतील तिसरा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या शार्दुल ठाकूर (४/५२) याच्या भेदक माºयाच्या जोरावर भारताने सहाव्या एकदिवसीय सामन्यात यजमान दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४६.५ षटकात २०४ धावांमध्ये गुंडाळला. यासह मालिका ५-१ अशा वर्चस्वासह जिंकण्याची सुवर्णसंधी विराटसेनेला मिळाली आहे. सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. युवा शार्दुलने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना कर्णधार एडेन मार्करम (२४), हाशिम आमला (१०), फरहान बहारदीन (१) आणि अँडिले फेहलुकवायो (३४) असे महत्त्वाचे चार बळी मिळवत यजमानांचे कंबरडे मोडले. कोणत्याही दडपणाविना आक्रमक मारा करताना शार्दुलने आफिकन फलंदाजांना फटकेबाजीपासून रोखले. त्याचवेळी ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ बळी घेत यजमानाच्या फलंदाजीतील हवा काढली. हार्दिक पांड्या व कुलदीप यादव यांनीही नियंत्रित मारा करताना प्रत्येकी एक बळी घेतले. आफ्रिका दौºयात कसोटी मालिकेपासून चमकदार कामगिरी केलेल्या भारतीय गोलंदाजांपुढे पुन्हा एकदा यजमानांचे फलंदाज चाचपडताना दिसले. मधल्या फळीतील खायेलिहले झोंडो याने झळकावलेल्या संयमी अर्धशतकाचा अपवाद वगळता इतर फलंदाजांना आपल्या लौकिकानुसार खेळ करता आला नाही. झोंडोने ७४ चेंडूत ३ चौकार व २ षटकारांसह ५४ धावा काढल्या. त्याचवेळी मार्करम, आमला, डिव्हिलियर्स यांनी पुन्हा एकदा निराशा केली. यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेन यानेही ४० चेंडूत २२ धावांची संथ खेळी केली. अडखळती सुरुवात झालेल्या दक्षिण आफ्रिकेला सातव्या षटकात २३ धावांवर आमलाच्या रुपाने पहिला धक्का बसल्यानंतर ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद झाले. अखेरच्या क्षणांमध्ये फेहलुकवायोने २ चौकार व २ षटकारांसह केलेल्या थोड्याफार आक्रमणामुळे यजमानांना दोनशेचा टप्पा पार करण्यात यश आले. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- शार्दुलचे 4 बळी, द. आफ्रिका 204 धावांत गारद, भारतासमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान
शार्दुलचे 4 बळी, द. आफ्रिका 204 धावांत गारद, भारतासमोर विजयासाठी 205 धावांचे आव्हान
भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा डाव अडचणीत सापडला असून आफ्रिकेच्या आठ विकेट गेल्या आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2018 4:15 PM
ठळक मुद्देसहा वनडे सामन्यांच्या मालिकेतील आज शेवटचा सामना असून यजमानांची प्रतिष्ठा देखील पणाला लागली आहे. २०१९ चा विश्वचषक लक्षात घेता संघ व्यवस्थापन नव्या खेळाडूंची चाचपणी करण्याच्या विचारात आहे.