Join us

विराट-जैस्वाल रनआऊटच्या गोंधळावरून कॉमेंट्री बॉक्समध्ये जुंपली, मांजरेकर-इरफान भिडले (Video)

Irfan Pathan Sanjay Manjrekar verbal fight video: यशस्वी जैस्वाल धावबाद झाल्याच्या मुद्द्यावरून सुरु होती चर्चा अन् पुढे खूप काही घडलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 17:35 IST

Open in App

Irfan Pathan Sanjay Manjrekar verbal fight video: चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर भारताचे १६४ धावांत ५ गडी बाद केले. स्टीव्ह स्मिथच्या दमदार शतकाच्या (१४०) जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावांपर्यंत मजल मारली. याला प्रत्युत्तर देताना भारताची वरची फळी अडखळली. केवळ यशस्वी जैस्वाल (Yashasvi Jaiswal) चांगल्या लयीत खेळताना दिसला. पण विराट कोहली (Virat Kohli) सोबत झालेल्या मैदानावरील गोंधळामुळे ८२ धावांवर धावबाद व्हावे लागले. याच मुद्द्यावरून कॉमेंट्री बॉक्समध्ये चर्चा सुरु असताना, समालोचक संजय मांजरेकर आणि इरफान पठाण यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळाली.

नेमका काय घडला प्रकार?

संजय मांजरेकर यांनी विराट कोहलीच्या विरोधात आणि यशस्वी जैस्वालच्या बाजूने अतिशय रोखठोक भूमिका मांडली. मांजरेकर म्हणाला की, विराटने केलेली चूक ही शाळेतल्या मुलांच्या चुकीएवढी साधी आहे. धावण्याचा निर्णय यशस्वी जैस्वालचा होता. विराटने धावायला सुरुवात केली, मागे पाहिले आणि नंतर धावायला नकार दिला. ही विराटची चूक आहे. विराट धावला असता तर पॅट कमिन्सचा थ्रो नॉन स्ट्राईकला आला असता आणि जैस्वाल त्याआधीच पोहोचला असता. पण विराटने अचानक मत बदलल्याने यशस्वी जैस्वालकडे मागे धावत जाण्याएवढा वेळ मिळालाच नाही. त्यामुळे तो बाद झाला.

याबाबत बोलताना इरफान पठाणने संजय मांजरेकरांचा मुद्दा खोडून काढला आणि वेगळे मत मांडले. इरफान म्हणाला की, क्रिकेटमध्ये असाही एक नियम आहे की चेंडू कट मारून पॉईंटच्या दिशेला गेला तर स्ट्राईक किंवा नॉन स्ट्राईक दोन्हीपैकी कोणीही एक फलंदाज नकार देऊ शकतो.

यावरून दोघांमध्ये चांगलीच जुंपली. इरफान पठाण आपलं म्हणणं रेटून मांडत होता. त्यावर मांजरेकर म्हणाला की, तू मला बोलू देणारच नसशील तर तुझं सुरू ठेव. त्यावर इरफान त्याला म्हणाला की आपण दोघेही मतं मांडतोय, चूक बरोबर असा प्रश्नच नाही. त्यावर मांजरेकर म्हणाला की आता इरफानने शोधलेला नवा नियम क्रिकेट बूकमध्ये टाकावा लागेल. अखेर टीव्ही होस्टने मध्यस्थी करत हा विषय थांबवला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाइरफान पठाणयशस्वी जैस्वालविराट कोहलीआॅस्ट्रेलिया