Join us  

विराट मोहालीत खेळणार शंभरावी कसोटी; श्रीलंकाविरुद्धच्या मालिकेतील वेळापत्रकात बदल

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती देताना, नव्या वेळापत्रकानुसार आधी टी-२० मालिका खेळविण्यात येणार असल्याचे सांगितले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2022 7:37 AM

Open in App

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर लगेच भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. मात्र, या मालिकेच्या वेळापत्रकामध्ये आता बीसीसीआयने बदल केला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी याबाबत माहिती देताना, नव्या वेळापत्रकानुसार आधी टी-२० मालिका खेळविण्यात येणार असल्याचे सांगितले. यानुसार विराट कोहली आपला शंभरावा कसोटी सामना मोहालीत खेळणार असल्याचे स्पष्ट होत आहे.बदल झालेल्या वेळापत्रकाबाबत बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. नव्या वेळापत्रकानुसार, भारत-श्रीलंका यांच्यामध्ये आधी टी-२० मालिका खेळविण्यात येईल. यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येईल; परंतु मालिकेतील पहिला सामना आधी बंगळुरुमध्ये होणार होता, तो आता ४ ते ८ मार्चदरम्यान मोहालीमध्ये खेळविण्यात येईल. याचाच अर्थ विराट कोहली आपला शंभरावा कसोटी सामना मोहालीमध्ये खेळेल.कोहलीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यातच १००वा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. यानंतर जुन्या वेळापत्रकानुसार लंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना बंगळुरुमध्ये होणार होता. हा सामना कोहलीसाठी अत्यंत विशेष ठरणार होता. आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरकडून (आरसीबी) खेळणाऱ्या कोहलीसाठी बंगळुरुचे मैदान विशेष आहे. कोहलीचा आरसीबीमधील सहकारी आणि अत्यंत जवळचा मित्र असलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या एबी डीव्हिलियर्स यानेही बंगळुरु येथेच शंभरावा कसोटी सामना खेळला होता, पण आता नव्या वेळापत्रकानुसार कोहली आपला खास कसोटी सामना मोहालीमध्ये खेळेल.बायो-बबलमध्ये राहून प्रवास करताना दोन्ही संघांना अडचणी होऊ नयेत, यासाठी लंकेविरुद्धच्या मालिकेचे वेळापत्रक बदलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका लखनौ आणि धर्मशाळा येथे होणार आहे, तसेच कसोटी मालिकेतील पहिला सामना मोहली आणि दुसरा बंगळुरु येथे खेळविण्यात येऊ शकतो.

टॅग्स :विराट कोहली
Open in App