सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज असलेल्या विराट कोहलीचा आज 31वा वाढदिवस... कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासोबत भूटानमध्ये सुट्टीवर गेला आहे आणि तेथेच त्यानं आपला वाढदिवस साजरा केला. क्रिकेट कारकिर्दीत विराटने अनेक विक्रम मोडले, तर काही नवे विक्रम नोंदवलेही. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची ( आयसीसी) मानाची गदा सलग तीनवेळा जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून विराटनं स्वतःलाच एक भावनिक पत्र लिहिले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट केलेले हे पत्र त्यानं 15 वर्षांच्या विराटसाठी लिहिले आहे. त्यातून त्यानं जगण्याचा खरा अर्थ समजावून सांगितला आहे. या पत्रातून त्यानं स्वतःलाच नव्हे, तर अनेक युवकांना एक संदेश दिला आहे. मिळालेली संधी धुडकावू नका, प्रत्येक संधीवर सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. या प्रवासात अपयश येईल, परंतु पुन्हा उभे राहा, प्रयत्न करा, असा मंत्र कोहलीनं दिला आहे.
या त्यानं लिहिलं की,''माझ्या भविष्याबाबत तुझ्याकडे अनेक प्रश्न असतील, परंतु मी प्रत्येकाचे उत्तर देणार नाही. कारण, मलाच माहित नाही की पुढे काय वाढून ठेवलं आहे. प्रत्येक भेट ही गोड असते, प्रत्येक आव्हान हे थरारक असतं आणि प्रत्येक अपयश हे नवीन काही तरी शिकवणारं असतं. हे तुम्हाला आता कळणार नाही, पण जेव्हा तुम्ही लक्ष्यापर्यंत पोहोचाल, तेव्हा हा प्रवास तुम्हाला बरचं काही शिकवून गेलेला असेल.''
''तुमच्यावर प्रेम करणारे खूप असतील आणि तुमचा तिरस्कार करणारेही प्रचंड असतील, कदाचित तुम्ही त्यांना ओळखतही नसाल. त्यामुळे त्यांची पर्वा करू नका, स्वतःवर विश्वास कायम ठेवा. तुम्हाला वाटतं की पालक तुम्हाला समजून घेत नाहीत, परंतु तेच तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतात. त्यांच्यावर प्रेम करा, त्यांचा आदर करा आणि त्यांच्यासोबत जमेल तितका वेळ घालवा. वडिलांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता.''
भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजात विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानं 239 वन डे सामन्यांत 11520 धावा केल्या आहेत. कसोटीत त्यानं 82 सामन्यांत 7066 धावा केल्यात. कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं घरच्या मैदानावर सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.