नवी दिल्ली: न्यूझीलंडविरुद्ध १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपविले जाण्याची शक्यता आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि राष्ट्रीय निवड समिती यांच्यात पुढील काही दिवसात बैठक अपेक्षित असून, याशिवाय वन डेत नेतृत्व सांभाळत असलेल्या विराटच्या भविष्यावरदेखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
विराटने टी-२० तील नेतृत्व सोडण्याची आधीच घोषणा केली आहे. वन डे संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढले जाईल, असे बोलले जाते. त्यामुळे तो स्वत:हूनच एकदिवसीय संघाचे कर्णधारपदही सोडू शकतो. गांगुली आणि जय शाह हे निवडकर्त्यांसोबत व्हर्च्युअल बैठक घेतील. त्यात नेतृत्वाविषयी चर्चा केली जाईल. ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकासाठी जवळपास ११ महिन्यांचा कालावधी आहे. यंदा भारतीय संघ एकही वन डे मालिका खेळणार नाही.
न्यूझीलंडविरुद्ध टी-२० मालिकेत रोहितकडे कर्णधारपद सोपविले तर कर्णधाराच्या रूपाने ती त्याची पहिली मालिका असेल. न्यूझीलंडविरुद्ध कानपूर (२५ ते २९ नोव्हेंबर) तसेच मुंबई (३ ते ७ डिसेंबर) येथे होणाऱ्या दोन कसोटी सामन्यातून मात्र रोहित विश्रांती घेण्याची शक्यता असल्याचे बीसीसीआय सूत्रांचे मत आहे. असे झाल्यास जे खेळाडू टी-२० मालिकेसाठी विश्रांती घेतील त्यांना कसोटीत संधी मिळू शकेल.
हार्दिक, भुवी यांची हकालपट्टी?
हार्दिक पांड्या आणि भुवनेश्वर कुमार यांची हकालपट्टी निश्चित मानली जाते. त्यांची जागा ऋतुराज गायकवाड, आवेश खान आणि युजवेंद्र चहल घेऊ शकतील. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती दिली जाईल. पांड्याचा पर्याय म्हणून व्यंकटेश अय्यर याला स्थान मिळू शकते. जम्मू काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक याच्या नावाचाही विचार अपेक्षित आहे. अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, दीपक चाहर हे चेहरे टी-२० संघात तर शुभमन गिल, मयंक अग्रवाल, उमेश यादव हे कसोटी संघात असतील.
Web Title: Virat Kohli's captaincy released from Team India? Hardik pandya, Bhuvneshwar Kumar may out
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.