मुंबई - माजी भारतीय क्रिकेटर मोहम्मद कैफने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचं वेगळ्या अंदाजात कौतुक केलं आहे. पण विराट कोहलीचं कौतुक करणा-या मोहम्मद कैफवर युजर्स तुटून पडले असून कौतुकाचा वर्षाव करत आहेत. विराट कोहलीचं कौतुक करताना मोहम्मद कैफने ट्विट केलं की, 'विराट कोहलीच्या शतकांचा वेग सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) छाप्यांपेक्षाही जास्त आहे'. मोहम्मद कैफने केलेलं हे कौतुक युजर्सना प्रचंड आवडलं आणि त्यांनीही मोहम्मद कैफचं गुणगान गाण्यास सुरुवात केली.
सेंच्युरिअनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मालिकेतील सहाव्या आणि अखरेच्या सामन्यात विराट कोहलीने शतक ठोकलं. विराट कोहलीच्या या जबरदस्त शतकानंतर मोहम्मद कैफने ट्विट केलं. मोहम्मद कैफने ट्विटमध्ये लिहिलं की, 'विराट कोहलीच्या शतकांचा वेग सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) छाप्यांपेक्षाही जास्त आहे. आरामात बसा आणि क्रिकेटर्सच्या अनेक पिढ्यांमधील एका महान क्रिकेटरला खेळताना पहा'.
शार्दुल ठाकूरच्या (४/५२) भेदकतेनंतर रनमशीन विराट कोहलीच्या (१२९*) नाबाद शतकी तडाख्याच्या जोरावर भारताने दक्षिण आफ्रिकेचा अखेरच्या सहाव्या एकदिवसीय सामन्यात ८ गड्यांनी धुव्वा उडवला. या दिमाखदार विजयासह टीम इंडियाने एकदिवसीय मालिकेवर ५-१ असा कब्जा करताना यजमानांना अक्षरश: रडवले. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेला २०४ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर भारताने ३२.१ षटकात केवळ २ फलंदाजांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पार केले.
विराट कोहलीच्या (१२९*) नाबाद शतकी तडाख्यामुळे त्याला मॅन ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आलं. इतकंच नाही, तर सीरिजमध्ये तीन शतक आणि 2 अर्धशतक करून सगळ्यात जास्त रन्स केल्याने विराटला मॅन ऑफ द सीरिजचा किताबही देण्यात आला. या शानदार विजयानंतर विराट कोहलीने त्याच्या सुंपूर्ण विजयाचं श्रेय पत्नी अनुष्का शर्माला दिलं. 'दक्षिण आफ्रिका दौरा अनेक चढ-उतारांचा होता. लोकांनी यासाठी मैदानात तसंच मैदानाबाहेर साथ दिली. माझ्या जवळच्या लोकांना या विजयाचं श्रेय जातं. माझी पत्नी या संपूर्ण दौऱ्यादरम्यान माझा उत्साह वाढवत होती, यासाठी तिला मोठं श्रेय जातं.