भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली प्रदीर्घ काळानंतर पुन्हा एकदा कसोटी सामना खेळताना दिसणार आहे. 19 सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होत आहे. विराट तब्बल नऊ महिन्यांनंतर कसोटी सामना खेळणार आहे. यापूर्वी, काही वैयक्तिक कारणांमुळे तो या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत खेळला नव्हता. महत्वाचे म्हणजे आता बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याला एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल.
...तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 27 हजार धावा करणारा खेळाडू ठरेल -बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत कोहलीला अनेक विक्रम करण्याची संधी असेल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी कोहलीला केवळ 58 धावांचीच आवश्यकता आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याने ही कामगिरी केली तर तो सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून सर्वात जलद 27 हजार धावा करणारा खेळाडू ठरेल.
यानंतर, सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा आणि रिकी पाँटिंगनंतर अशी कामगिरी करणारा कोहली चौथा खेळाडू ठरेल. महत्वाचे म्हणजे, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 16,000, 17,000, 18,000, 19,000, 20,000, 21,000, 22,000, 23,000, 24,000, 25,000 आणि 26,000 धावा बनवण्याचा विक्रमही विराट कोहलीच्या नावे आहे.
बांगलादेश मालिकेसाठी टीम इंडिया -रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप , जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.