Virat Kohli’s Childhood Coach Slams Hardik Pandya - विराट कोहलीचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्या याची शाळा घेतली. हार्दिकने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निवडीबाबत नुकतेच एक विधान केले होते, त्यावरून शर्मा यांनी हार्दिकवर टीका केली. तुला संघात निवडुन समितीनं तुझ्यावर उपकार केले, अशा भाषेत त्यांनी हार्दिकला सुनावले.
भारतीय संघाला २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला. या स्पर्धेत हार्दिक पांड्याच्या ( Hardik pandya) निवडीवरून बराच वाद रंगला. हार्दिक गोलंदाजी करण्यासाठी पुर्णपणे तंदुरूस्त नव्हता, तरीही त्याची निवड केली गेली. भारताच्या पराभवानंतर हार्दिकवर प्रचंड टीका केली गेली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आपली निवड फलंदाज म्हणून केली गेली असल्याच धक्कादायक खुलासा त्यानं केला. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी हार्दिकची निवड अष्टपैलू खेळाडू म्हणून केल्याचा दावा केला होता. तो प्रत्येक सामन्यात चार षटकं फेकेल, असंही ते म्हणाले होते. पण, हार्दिकनं चेतन शर्मा यांचा दावा खोडून काढला.
हार्दिक म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेतील भारतीय संघाच्या कामगिरीचा संपूर्ण दोष मला दिला गेला. प्रत्येक जण माझ्यावरच दगड फेकत होता. मी गोलंदाजी केली नाही, हे खरं आहे. पण, माझी निवड एक फलंदाज म्हणून केली गेली होती. पहिल्या सामन्यात गोलंदाजी करण्यासाठी मी अथक परिश्रम घेतले, परंतु मी गोलंदाजी करू शकलो नाही. दुसऱ्या सामन्यात गोलंदाजी केली, परंतु मला ती करायला नको हवी होती. मी संघासाठी गोलंदाजी केली. पण, त्याचा शेवट गोड झाला नाही.''
हा बालीशपणा आहे... - राजकुमार शर्मा
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या विधानाची शर्मा यांनी शाळा घेतली. हार्दिकने अपरिपक्व विधान केले आहे, उलट त्याने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी त्याची निवड केली म्हणून निवड समितीचे आभार मानायला हवे, असे शर्मा म्हणाले. ''ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत निवड करून सिलेक्टर व संघ व्यवस्थापनाने हार्दिकवर उपकार केले. तरीही त्याने केलेले विधान हे अपरिपक्व आहे. तंदुरुस्तीशी झगडत असतानाही तुझी वर्ल्ड कप स्पर्धेसाठी निवड झाली, यासाठी तू त्यांचे आभार मानायला हवे,''असे शर्मा यांनी सांगितले.