नवी दिल्ली : विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध होणाऱ्या वन डे मालिकेतून स्वत: माघार घेतल्याची चर्चा आहे. त्याला विश्रांती हवी होती आणि बीसीसीआयने त्याची विनंती मान्य केली. त्याआधी इंग्लंडविरुद्ध टी-२० आणि वन डे मालिकेत विराटची खराब कामगिरी कायम राहिल्यास काय, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
टी-२० क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडल्यापासून नऊ महिन्यांनंतरही विराट कोहलीला सूर गवसलेला नाही. ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी विराटला भारतीय संघात स्थान मिळवणे अवघड झाले आहे.रोहित, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या हे विंडीजविरुद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळणार आहेत. दुसरीकडे विराट पुढील दहा दिवसांत इंग्लंडविरुद्ध टी-२० आणि वनडे मालिकेत कशी कामगिरी करतो, यावर त्याची पुढील वाटचाल विसंबून असेल.
संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने विराटला टी-२० संघाच्या मधल्या फळीत फिट करण्याबाबत अद्याप स्पष्ट काही सांगितले नाही. वरिष्ठ खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर टी-२० संघाचा विचार केला जाईल. गेल्या एक वर्षाहून अधिक काळ झाला विराटने कसोटी, वनडे आणि टी-२० मध्ये अपेक्षित कामगिरी केली नाही. टी-२० क्रिकेटमधील त्याचा संघर्ष आयपीएलमध्येदेखील दिसून आला होता. सूर्यकुमार यादव, पंत, पांड्या, जडेजा, दीपक हुड्डा, संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर असे अनेक पर्याय संघात आहेत. हे सर्व खेळाडू चांगली कामगिरी करीत आहेत. विराट कोहली मात्र मागे पडू शकतो. निवड समिती आणि संघ व्यवस्थापन टी-२० विश्वचषकासाठी सर्वोत्तम संघ निवडण्याचा विचार करीत असून, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेद्वारे संघ जवळपास निश्चित केला जाईल.
संघातील ज्येष्ठ खेळाडूंचे वारंवार संघाबाहेर बसणे भारतीय क्रिकेट बोर्डाला खुणावते आहे. निवड समितीच्या प्रत्येक बैठकीत वर्क लोड मॅनेजमेंटचा मुद्दा येतो. रोहित, कोहली, पांड्या, बुमराह, शमी या सर्व खेळाडूंना नेहमी विश्रांती दिली जाते. बीसीसीआयचे सर्वांसोबत मोठ्या रकमेचे करार केले आहेत. पूर्णवेळ कर्णधारपद सांभाळल्यानंतरही रोहित फार कमी सामन्यात खेळला. पांड्या पुन्हा संघात दाखल झाला तर बुमराह आणि शमीदेखील निवडक सामन्यांत खेळले आहेत. विराटलादेखील प्रत्येक मालिकेनंतर विश्रांती दिली आहे. यामुळे एक तगडा संघ उभारणीसाठी दमछाक होत आहे. ऋषभ पंत हा एकमेव खेळाडू भारताकडून सातत्याने खेळत आहे.
द्रविड यांना विश्रांती, लक्ष्मण कोचकसोटीत सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर राहुल द्रविड हे संघाबाहेर बसणार आहेत. बीसीसीआयने द्रविड यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला. व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना पहिल्या टी-२० सामन्यासाठी प्रशिक्षकपद दिले आहे.