Join us  

कौंटी खेळण्याचा कोहलीचा निर्णय योग्य-वेंगसरकर

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळण्यास दिलेले प्राधान्य आणि पुढील महिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 6:53 AM

Open in App

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आगामी इंग्लंड दौऱ्याच्या तयारीसाठी कौंटी क्रिकेट खेळण्यास दिलेले प्राधान्य आणि पुढील महिन्यात होणा-या अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून घेतलेली माघार योग्य निर्णय असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केले.कौंटी क्रिकेट खेळण्याच्या कोहलीने घेतलेल्या निर्णयाविषयी वेंगसरकर म्हणाले की, ‘हा एक चांगला निर्णय आहे. कारण यामुळे इंग्लंडमधल्या वातावरणाशी जुळवून घेण्यास कोहलीला वेळ मिळेल. गेल्यावेळचा इंग्लंड दौरा कोहलीसाठी चांगला ठरला नव्हता आणि त्यामुळे तो या वेळी चांगली कामगिरी करण्यास तो उत्सुक आहे.’ वेंगसरकर पुढे म्हणाले की, ‘गेल्या चार वर्षांत त्याने स्वत:ला जगातील अव्वल फलंदाज म्हणून सिद्ध केले आहे. त्यामुळेच त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. इंग्लंड दौरा त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणारा आहे आणि मला विश्वास आहे की तो यामध्ये चांगली कामगिरी करेल.’त्याचप्रमाणे, ‘जर मी निवडकर्ता असतो, तर चेतेश्वर पुजाराला इंग्लंडमध्ये थांबून यॉर्कशरसाठी कौंटी क्रिकेट खेळण्यास सांगितले असते. कारण तो पुढे इंग्लंडमध्येच खेळणार आहे. त्याच्यासाठी अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्यात काहीच अर्थ नाही.आता पुजारा भारतात परतेल आणि अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल. पण मला यात काहीच विशेष वाटत नाही. कारण तो आता इंग्लंडमध्ये आहे आणि कौंटी क्रिकेटमध्ये अजूनही तो चांगली कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे त्याला इंग्लंडमध्ये थांबून कौंटी खेळण्याची आणखी संधी मिळाली असती.’

टॅग्स :विराट कोहली