मुंबई, दि. 18 - श्रीलंका क्रिकेट संघाच्या बसवर 2009 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं पुनरागमन झालं आहे. 2009 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कोणताही संघ पाकिस्तानात जायला तयार नव्हता. गेल्या वर्षी झिंबाब्वे संघाने हिम्मत दाखवून पाकिस्तानचा दौरा केला आणि त्यानंतर आता काही दिवसांपूर्वीच वर्ल्ड XI टीम पाकिस्तानात तीन सामन्यांची T-20 मालिका खेळण्यास गेली होती.
पाकिस्तानात क्रिकेटचं पुनरागमन झाल्यामुळे पाक चाहते आनंदात आहेत मात्र, वर्ल्ड XI टीममध्ये टीम इंडियाचे खेळाडू सहभागी न झाल्याचं दुःख देखील त्यांना आहे. विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी सहभागी न झाल्याने पाकचा दिग्गज खेळाडू शाहिद आफ्रिदी यानेही नाराजी व्यक्त केली होती. कोहली-धोनीचा खेळ पाहता आला नाही यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांनी मॅच दरम्यान त्यांच्या नावाने मिस यू असे बॅनर देखील झळकावले. तर काही क्रिकेट चाहत्यांनी त्यांची खिल्ली देखील उडवली. यावेळी वर्ल्ड XI सोबतच्या अखेरच्या सामन्यात गद्दाफी स्टेडियमवर एका वेगळ्याच बॅनरने सर्वांचं लक्ष आकर्षित केलं. या बॅनरवर 'विराट कोहली को अम्मी से इजाजत नहीं मिली पाकिस्तान आने की' असं लिहीलं होतं.
क्रिकेटबाबत बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाइट ESPNcricinfo ने हे बॅनर ट्विट केलं. या ट्विटवर अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. ( या बॅनरची खातरजमा लोकमतने केलेली नाही)