मुंबई- टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली इंग्लंड दौऱ्यातून माघार घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे. इतकंच नाही, तर विराटचं काउंटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्नही अर्धवट राहण्याची चिन्हं आहेत. विराट कोहलीच्या आरोग्याबद्दलच्या तक्रारीमुळे काउंटी क्रिकेट आणि इंग्लंड दौऱ्यात विराट नसल्याचं वृत्त मुंबई मिररने दिलं आहे. विराट कोहली स्लिप डिस्कने त्रस्त आहे. मेडिकल रिपोर्टनुसार, विराटला काउंटी क्रिकेट खेळता येणार नाही. तसंच इंग्लंड दौऱ्यालाही जाता येणार नाही.
खार हॉस्पिटलमधील विराट कोहलीच्या डॉक्टरांनी त्याला काउंटी क्रिकेट न खेळण्याचा सल्ला दिला आहे. काउंटी क्रिकेटमुळे हर्निएटेड डिस्कचा (म्हणजे पाठीच्या दोन कण्यांमधील गादी मागे किंवा पुढे सरकू शकते.) त्रास आणखी वाढेल व त्यामुळे इंग्लंड दौऱ्यासाठी खेळता येणार नाही.
दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर काउंटी खेळणार नसल्याचं विराटने काउंटी क्लबला कळवलं आहे. पण बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने विराटला स्पिल डिस्कचा त्रास नसून नेक स्प्रेनचा त्रास असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, विराट कोहलीकडून कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाही.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सप्टेंबर महिन्यात इंग्लंड विरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी काउंटी क्रिकेटमध्ये खेळणार होता. तो कोणत्या काउंटी संघातून खेळेल हे अजून नक्की नाही. मात्र तो सर्रेकडून खेळण्याची शक्यता आहे. २०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातील अपयश धुऊन काढण्यासाठी कोहली तयारी करत होता.