Join us  

कोहलीला न विचारता झाली प्रशिक्षकाची निवड; या 5 निकषावर ठरला कोच

भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती झाली. कॅप्टन विराट कोहलीनंही त्याचे वजन शास्त्रींच्या पारड्यात टाकले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 7:07 PM

Open in App

मुंबई : भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची फेरनियुक्ती झाली. कॅप्टन विराट कोहलीनंही त्याचे वजन शास्त्रींच्या पारड्यात टाकले होते. पण, आजची फेरनिवड करताना कोहलीचं मत विचारात घेतले नसल्याचे क्रिकेट सल्लागार समितीनं स्पष्ट केले. वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी कोहलीनं शास्त्री यांनाच प्रशिक्षक झालेले पाहायला आवडेल, असे म्हटले होते. पण, कोहलीला न विचारताच ही निवड झाल्याचे कपिल देव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ हा 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप पर्यंतच असणार आहे. त्यानंतर पुन्हा मुलाखती होतील. कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी ही त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीनं टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड केली. कपिल देव म्हणाले,''ही निवड करणे सोपे नव्हते. सर्वच उमेदवार तगडे होते. प्रत्येकाची मुलाखत घेतल्यानंतर आम्ही तिघंही प्रत्येकी 100 पैकी गुण देत होते. पण, ते गुण एकमेकांना सांगत नव्हतो. सर्व मुलाखती झाल्यानंतर आम्ही सर्वांच्या गुणांची बेरीज केली आणि त्यात शास्त्री अव्वल ठरले. पण, फार थोड्या फरकाने त्यांना हे प्रशिक्षकपद मिळाले. मी आता मार्क सांगणार नाही, परंतु माईक हेसन आणि टॉम मुडी यांनी त्यांना कडवी टक्कर दिली. हेसन व मुडी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले.'' कोहलीला विचारले का, या प्रश्नावर कपिल देव म्हणाले,''आम्ही कोणाला विचारलं नाही. जर कोहलीला विचारायचे असते तर आम्ही सर्व खेळाडूंची मतं जाणून घेतली असती. आमच्याकडे तशी सुविधा नव्हती. समितीनं काही निकषांवर ही निवड केली आहे. प्रशिक्षणाचं कौशल्य, अनुभव, यश, बांधिलकी आणि संवाद या पाच निकषावर ही निवड झाली आहे.''    

टॅग्स :रवी शास्त्रीविराट कोहलीकपिल देवबीसीसीआय