मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची तुलना सतत महान फलंदाज सचिन तेंडुलकर सोबत केली गेली आणि यापुढेही सुरू राहील. कोहलीची प्रत्येक खेळी ही मास्टर ब्लास्टरच्या कोणत्या ना कोणत्या विक्रमाला आव्हान देणारी ठरत आली आहे. त्यामुळे तेंडुलकरचे अनेक विक्रम हा फक्त आणि फक्त कोहलीच मोडू शकतो, असा ठाम विश्वास चाहत्यांमध्ये निर्माण झाला आहे. याही वेळेला कोहलीने तो विश्वास सार्थ ठरवत तेंडुलकरला मागे टाकले आहे. पण तेंडुलकरचा हा विक्रम मोडण्यासाठी चाहत्यांनीच कोहलीला सहकार्य केले आहे.
कॅप्टन कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच धर्तीवर कसोटी व वन डे मालिकेत पराभवाची धूळ चाखवली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा कोहली हा भारताचा आणि आशियातील पहिलाच कर्णधार ठरला. त्यापाठोपाठ त्याने न्यूझीलंडमध्येही वन डे मालिका जिंकली. 2009 नंतर भारतीय संघाने प्रथमच न्यूझीलंडमध्ये वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
2018 मध्ये कोहलीने वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 10000 धावांचा तेंडुलकरच्या नावावर असलेला विक्रम मोडला होता. कोहलीने मागील दहा वर्षांत तेंडुलकरचे अनेक विक्रम मोडले आणि अनेक विक्रमाशी बरोबरीही केली. पण यावेळी मैदानावर नव्हे तर सोशल नेटवर्किंग साईटवर कोहलीने क्रिकेटचा देव तेंडुलकरला मागे टाकले आहे. ट्विटरवर कोहलीच्या चाहत्यांची संख्या 28,071,116 इतकी झाली आहे आणि तेंडुलकरचे ट्विटरवर 28,060,878 इतके चाहते आहेत. सध्याच्या घडीला ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या भारतीय खेळाडूंत कोहली अव्वल स्थानावर आहे.