India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना आणखी किती संधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर आज विराट कोहलीनं दिले. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारानं ८६ चेंडूंत ५३ आणि अजिंक्य रहाणेनं ७८ चेंडूंत ५८ धावांची खेळी करून टीम इंडियासह स्वतःच्या कारकीर्दिलाही सावरले. या अनुभवी खेळाडूंमुळे हनुमा विहारी व युवा फलंदाज श्रेयस अय्यर यांच्यावर अन्याय होत असल्याचा सूर उमटतोय. यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं त्याचं मत मांडलं होतं अन् आज विराटनेही त्याची बाजू मांडली.
मुख्य प्रशिक्षक द्रविड वरिष्ठ खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अंजिक्य रहाणे यांच्यापाठी भक्कमपणे उभा राहिला. रहाणे आणि पुजारा यांना आम्ही संघात शक्य तेवढी संधी देऊ, असे संकेत द्रविडने दिले होते. त्यामुळे हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यर यासारख्या फलंदाजांना अंतिम ११ चा भाग बनण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. द्रविड म्हटले होते की, श्रेयसने या आधी दोन-तीन सामन्यांत असे केले आहे. त्याला संधी मिळत आहे. तो चांगले प्रदर्शन करीत आहे आणि आशा आहे की त्याची देखील वेळ येईल. मात्र याचा हा अर्थ नाही की त्याला रहाणे आणि पुजाराऐवजी प्राथमिकता दिली जाईल. या वरिष्ठ खेळाडूंनादेखील वाट बघावी लागली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत सुरुवातीला खूप धावा केल्या होत्या. मात्र, वाट बघावी लागली होती.
''मी संक्रमणाबद्दल बोलू शकत नाही. ते जबरदस्तीनं झालेलं नसावं. तुम्ही मागील कसोटी पाहिली असेल तर, पुजारा आणि रहाणे यांची खेळी अमूल्य होती. यापूर्वीही या दोघांनी अशी कामगिरी करून दाखवलीय. तुम्ही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पाहिलेच असेल. परिवर्तन व्हायला हवं, पण ते नैसर्गिक असावं जबदस्तीनं केलेलं नसावं, असे मत विराटनं व्यक्त केलं.