Join us  

Virat Kohli's press conference Live : MS Dhoni चा तो सल्ला कायमचा लक्षात राहिलाय; रिषभ पंतच्या चुकीवर विराट कोहलीनं सांगितला किस्सा 

India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आज पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरा गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 4:30 PM

Open in App

India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आज पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरा गेला. दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत फोडलेल्या फटाक्यानंतरच्या या विराटच्या पहिल्याच पत्रकार परिषदेची सर्वांना उत्सुकता होती. जोहान्सबर्ग कसोटीपूर्वी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यानं विराट नक्की तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी येईल, असे म्हटले होते. आज विराट आला पण कोणतीच फटकेबाजी झाली नाही. समोर आलेला चेंडू अलगदरित्या टोलवायचा, बाहेर जाणारा चेंडू सोडायचा, हे तंत्र त्याच्या आजच्या पत्रकार परिषदेत दिसले. एक चांगली गोष्ट अशी की विराट तिसरी कसोटी खेळण्यासाठी फिट आहे आणि केपटाऊनमध्ये आता दर्जेदार खेळ अनुभवायला मिळेल, याची गॅरंटी आहे.

मोहम्मद सिराज पूर्णपणे तंदुरूस्त नसल्याने तो तिसऱ्या कसोटीला मुकणार, हे निश्चित झाले आहे. दुसऱ्या कसोटीत त्याच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते. हनुमा विहारीनं चांगला खेळ करूनही त्याला पुन्हा बाकावर बसावे लागण्याची चिन्हे आहेत. अशात रिषभ पंतच्या शॉट सिलेक्शनवर विराटनंही मत मांडलं आहे. जोहान्सबर्ग कसोटीच्या दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांनी टीम इंडियाला मजबूत केले होते आणि रिषभला ती आघाडी पुढे नेण्याची संधी होती. पण, चुकीच्या फटक्यानं घात केला. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी रिषभच्या शॉट सिलेक्शनवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. विराटनं यावेळी रिषभची पाठराखण केली.

तो म्हणाला,''आपल्या कारकीर्दित आपण सर्वांनी चुका केल्या आहेत. रिषभसह संघ व्यवस्थापनानं चर्चा केली आहे. सराव सत्रादरम्यान ही चर्चा झाली आहे. चुका सर्वांकडून होतात, परंतु त्यातून शिकण्याची गरज आहे. केव्हा कोणता फटका मारायला हवं हे शिकायला हवं आणि रिषभ  स्वतः ही गोष्ट जाणून आहे.  यावेळी मला महेंद्रसिंग धोनीनं दिलेला एक सल्ला आठवतो. एकच चुक पुन्हा करण्यामध्ये ७-८ महिन्यांचा गॅप असायला हवी, म्हणजे आता एक चूक झाली तर तीच चूक ७-८ महिने होता कामा नये. तेव्हा तुम्ही दीर्घ काळ क्रिकेट खेळू शकता.''

 

पंतने आता जरा ब्रेक घ्यावा, दरवेळी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत

"रिषभ पंतला आता थोडा ब्रेक द्यायला हवा. तुमच्याकडे वृद्धिमान साहा सारखा उत्तम यष्टीरक्षक असताना पंतला विश्रांती देण्यात काहीच हरकत नाही. पंत हा खूप चांगली फलंदाजी करतो. तो खूप उत्तम यष्टीरक्षण करू शकतो हे साऱ्यांनाच माहिती आहे पण पंतने आता स्वत: ठरवायला हवं की कसोटी क्रिकेटमध्ये त्याला कशी फलंदाजी करायची आहे. जर पंतला स्वत:च्या फलंदाजीबाबत काही प्रश्न पडत असतील तर त्याला विश्रांती देणंच योग्य आहे", असं मत मदन लाल यांनी व्यक्त केलं.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामहेंद्रसिंग धोनीविराट कोहलीरिषभ पंत
Open in App