India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला जोहान्सबर्ग कसोटीत कंबरेत उसण भरल्यामुळे मुकावे लागले होते. त्या कसोटी दक्षिण आफ्रिकेनं कमबॅक करताना मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या कसोटीत दोन्ही संघ मालिका विजायासाठी प्रयत्नशील असतील. पण, या लढतीत विराट खेळणार का?; या प्रश्नावर कर्णधारानं हो असे उत्तर दिले. तिसरी कसोटी खेळण्यासाठी पूर्णपणे तंदुरूस्त असल्याचे विराटनं सांगितले, परंतु त्याच्या उत्तरातील पुढील वाक्यानं चाहत्याचे टेंशन वाढवले.
जोहान्सबर्ग कसोटीची नाणेफेक होण्यापूर्वी विराटच्या कंबरेत उसण भरली आणि त्यानं न खेळण्याचा निर्णय घेतला. लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया त्या कसोटीत खेळली, परंतु कर्णधार डीन एल्गरच्या चिवट खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं बाजी मारली. भारताच्या पहिल्या डावातील २०२ धावांच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेचा पहिला डाव २२९ धावांवर गडगडला. शार्दूल ठाकूरनं ६१ धावांत ७ विकेट्स घेतल्या. भारताच्या दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजारानं ८६ चेंडूंत ५३ आणि अजिंक्य रहाणेनं ७८ चेंडूंत ५८ धावांची खेळी केली. भारताचा दुसरा डाव २६६ धावांवर आटोपला. हनुमा विहारी ४० धावांवर नाबाद राहिला. भारतानं विजयासाठी ठेवलेल्या २४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं चौथ्या दिवशी विजय मिळवला. एल्गर ९६ धावांवर नाबाद राहिला.
या सामन्यात मोहम्मद सिराजच्या मांडीचे स्नायू ताणले गेले होते, त्यामुळे त्याला फार गोलंदाजी करता आली नाही. त्यामुळे तिसऱ्या कसोटीत त्याच्या समावेशाबाबद संदीग्धता होतीच. विराटनंही सिराज या कसोटीत खेळणार नसल्याचे जाहीर केले. तो म्हणाला, जेव्हा तुम्ही कसोटी सामना मिस करता , तेव्हा अपराध्यासारखं वाटतं आणि मी जखमी कसा झालो याचाच विचार करत बसतो. पण, तिसरी कसोटी खेळण्यासाठी मी पूर्णपणे तंदुरुस्त आहे. सिराज अजूनही दुखापतीतून सावरतोय. त्यामुळे सामना खेळण्यासाठी तो पूर्णपणे तंदुरूस्त होईल, असे मला वाटत नाही आणि आम्हालाही धोका पत्करायचा नाही. ''
सिराज खेळणार नसल्यामुळे त्याच्या जागी इशांत शर्मा किंवा उमेश यादव यांच्यापैकी कोणाला संधी मिळते की हनुमा विहारीला कायम ठेऊन विराट तीन जलदगती व एका फिरकीपटूसह मैदानावर उतरणार का, याची उत्सुकता आहे.