नवी दिल्ली : गेल्यावर्षी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी कर्णधार विराट कोहलीसह उडालेल्या खटक्यानंतर अचानकपणे आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर मोठा गदारोळही उठला. हा वाद गेल्या काही काळामध्ये शांत झाला असतानाच, पुन्हा एकदा या वादाची ठिणगी पडली आहे. प्रशासक समितीच्या (सीओए) सदस्या डायना एडुल्जी यांनीच या वादाला पुन्हा सुरुवात करताना थेट बीसीसीआयलाच धारेवर धरले. एडुल्जी यांच्यानुसार कुंबळे यांच्या राजीनाम्यानंतर बीसीसीआयने रवी शास्त्री यांना नियुक्त करुन नियमांचे उल्लघन केले आहे.एडुल्जी यांनी म्हटले आहे की, ‘भारताचा कर्णधार विराट कोहली सातत्याने बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जौहरी यांना कुंबळेविषयी संदेश पाठवायचा. यामुळेच कुंबळेला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला.’ दरम्यान, कुंबळेने आपला राजीनामा देताना म्हटले होते की, कर्णधार कोहली त्यांच्या प्रशिक्षण देण्याच्या पद्धतीवर नाराज होता. त्यामुळे कुंबळे यांनी राजीनामा दिला. परंतु आता एडुल्जी यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट ढवळून निघत आहे.दुसरीकडे, भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची निवड प्रक्रीया रोखण्यात यावी अशी मागणी एडुल्जी यांनी केली होती. मात्र याआधीच बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी निविदा मागवल्या असून आता ही प्रक्रीया थांबविता येणार नसल्याचे सांगत सीओए प्रमुख विनोद राय यांनी एडुल्जी यांची मागणी फेटाळली होती. त्यामुळे आता एडुल्जी यांनी थेट पुरुष संघाचे उदाहरण देताना पुन्हा वाद निर्माण केला आहे. एडुल्जी यांचे म्हणणे आहे की, ‘जर कोहलीच्या मागणीनुसार शास्त्री यांना भारतीय पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी निवडण्यात येत असेल, तर हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या पाठिंब्यानंतरही रमेश पोवारला महिला संघाच्या प्रशिक्षकपदी कायम का नाही ठेवता येणार?’एडुल्जी यांनी प्रशिक्षकपदासाठी तयार केलेली निवड प्रक्रीया चुकीची असल्याचे सांगतानाच त्यांनी राय यांच्याकडून स्थापन करण्यात आलेल्या ‘एड-हॉक’ समितीचाही विरोध केला आहे. त्यामुळेच आता सीओएमध्येच एडुल्जी व राय यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून एडुल्जी पोवार यांच्याकडे प्रशिक्षकपद सोपविण्याच्या प्रत्यत्नात आहेत. वाद मिटविण्यात अपयशीअनिल कुंबळे यांचा भारतीय संघासोबतचा करार २०१७ सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेपर्यंत होता. मात्र, मे महिन्याच्या अखेरीसच कुंबळे यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी बीसीसीआयने प्रशिक्षकपदासाठी नव्याने अर्ज मागविले होते. यावेळी सहा उमेदवारांची यादी जाहीर झाली होती, ज्यामध्ये कुंबळे यांच्या नावाचाही समावेश होता. ही सर्व प्रक्रीया सीओए आणि क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) यांच्या निगराणी खाली पार पडत होती. सीएसीमध्ये तेंडुलकर, गांगुली व लक्ष्मण यांचा समावेश होता. यानंतर सीएसीने कोहली-कुंबळे यांच्यातील वाद दूर करण्याचा प्रयत्नही केला. मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- विराट कोहलीमुळे कुंबळेला द्यावा लागला राजीनामा
विराट कोहलीमुळे कुंबळेला द्यावा लागला राजीनामा
सीओए सदस्या डायना एडुल्जी यांचा गौप्यस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 5:09 AM