भारताचा कर्णधार विराट कोहलीला काही दिवसांपूर्वी एक मोठा धक्का बसला होता. त्याचबरोबर सध्या सुरु असलेल्या न्यूझीलंडच्या दौऱ्यात कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कोहली आपला रिटायरमेंट प्लॅन बनवला आहे. हा प्लॅन कोहलीने सर्वांसमोर ठेवला आहे. त्यामुळे कोहली किती वर्षांमध्ये निवृत्ती पत्करणार, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.
प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. कधी कधी तर खेळाडूच्या आयुष्यात बॅड पॅही येत असतो. या पॅचमध्ये खेळाडूला चांगली कामगिरी करता येत नाही किंवा त्याच्याकडून पाहायला मिळत नाही. हा काळ प्रत्येक खेळाडूसाठी महत्वाचा असतो. कारण यावेळी त्याच्यावर टीका होते. ज्या व्यक्तींना त्याला डोक्यावर बसवलेलं असतं तिच माणसं त्याचे लचके तोडायलाही कमी करत नाहीत.
सध्याच्या घडीला कोहली हा चांगल्या फॉर्मात दिसत नाही. न्यूझीलंडच्या दौऱ्यावर कोहलीला चांगली कामगिरी करता आलेली नाही. भारताने न्यूझीलंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका ५-० अशा मोठ्या फरकाने जिंकली होती. पण कोहलीला या मालिकेत चमक दाखवता आली नव्हती. त्यानंतर झालेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही कोहलीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. न्यूझीलंडच्या दौऱ्यातील अपयश, व्यस्त क्रिकेटचे कार्यक्रम यामुळे कोहलीने आपला रिटायरमेंट प्लॅन बनवल्याचे बोलले जात आहे.
याबाबत कोहली म्हणाला की, " गेली ९ वर्षे सातत्याने मी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळत आहे. वर्षातील जवळपास ३०० दिवस तरी मी क्रिकेटमध्ये असतो. काही वेळा सामने नसले तरी सराव करावा लागतो. सराव करताना तुम्हाला फिटनेस कायम ठेवावा लागतो. पण आता यापुढील काही वर्षांत ही गोष्ट अशीच कायम राहील की नाही, हे मी सांगू शकत नाही."
कोहली म्हणाला की, " मी माझ्या कारकिर्दीसाठी एक प्लॅन बनवला आहे. त्यामुळे यापुढील तीन वर्षे मी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणार आहे. पण त्यानंतर मी या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळणार की नाही, याबाबत सांगू शकत नाही. कारण क्रिकेटचे कार्यक्रम फारच व्यस्त झाले आहे. त्यामुळे तीन वर्षांनंतर मी तिन्ही प्रकारांत खेळेन किंवा नाही, याबाबत मला अजून ठरवता आलेले नाही."