- सुनील गावस्कर लिहितात...
शानदार खेळी करणा-या डेव्हिड वॉर्नरवर आॅस्ट्रेलिया किती विसंबून असतो हे बंगळुरुत अनुभवायला मिळाले. १०० व्या सामन्यात वॉर्नरच्या शतकाच्या बळावर आॅस्ट्रेलियाने दौ-यात प्रथमच ३०० चा पल्ला गाठला. याआधी फिंचने शतक ठोकूनही संघाच्या ३०० धावा होऊ शकल्या नव्हत्या.
स्मिथने देखील आतापर्यत चांगलीच खेळी केली. पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरताच आॅस्ट्रेलिया संघाला पराभवाचे तोंड पहावे लागले, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. अन्य फलंदाजांना डेथ ओव्हरमध्ये भारतीय मा-याचा मुकाबला करणे कठीण गेले. त्यामुळे अखेरच्या दहा षटकांत १०० धावा निघू शकल्या नाहीत. अन्यथा अन्य सामने देखील भारताच्या हातृन निसटले असते.
भारतीय फलंदाजी देखील आघाडीच्या तीन फलंदाजांवर विसंबून आहे. हे तिन्ही फलंदाज अपयशी ठरताच दाणादाण उडते.
विशेषत: पाठलाग करतेवेळी फलंदाजांवर धावसरासरींचे मोठे दडपणच असते. केदार जाधवची फटकेबाजी दमदार होती पण भारताला विजयापर्यंत पोहचविणे त्यालाही जमले नाही. रोहित आणि रहाणे खेळत असताना भारत हा सामना काही षटके शिल्लक राखून जिंकेल, असे चित्र होते.
पण वन डेत आपण पाहतो की नवे फलंदाज धावगती राखण्यात अपयशी ठरताच प्रतिस्पर्धी संघ तुमच्या तोंडचा विजयी घास देखील हिरावून घेऊ शकतो.
विराट कोहली चुकांपासून लवकर बोध घेत असला तरी ईडन गार्डनवर केलेल्या चुकीची पुनरावृत्ती त्याने कालही केली. तो स्ट्रोक प्लेअर आहे पण धाव घेताना कधीकधी घाई करतो. त्यामुळे नॉन स्ट्रायकर फलंदाजावर दडपण येते. काल थर्डमॅनवरील चेंडूवर धाव घेताना त्याने स्थिरावलेल्या रोहित शर्माचा नाहक बळी दिला.
हे पहिल्यांदा घडलेले नाही. जेथे धावबाद होण्याची शक्यता असते त्या चेंडूवर धाव घेण्याची घाई करू नये, हे कोहलीला समजून घेण्याची गरज आहे.या चुकीमुळे सामन्याचे चित्र पालटले. हा क्षण आॅस्ट्रेलियासाठी उपयुक्त ठरला. यानंतर पांड्या आणि जाधव यांनी धावा काढून विजयी पथावर येण्याचे प्रयत्न केले तरी आॅस्ट्रेलिया संघाने सामना खेचून नेलाच.
नागपूरमध्ये जामठ्याची खेळपट्टी फलंदाजीला पूरक मानली जाते. अशावेळी डेव्हीड वॉर्नर फॉर्ममध्ये परतल्याने आॅस्ट्रेलियाची पाचवा सामना जिंकून मालिकेची यशस्वी सांगता करण्याची इच्छा असेल. (पीएमजी)
Web Title: Virat Kohli's revised revision was done by Kohli again
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.