Join us  

विराट कोहलीचा तो षटकार ठरला ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’!

Virat Kohli : आयसीसीने  टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्ध   भारताच्या सलामी लढतीत विराट कोहलीने वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या चेंडूवर मारलेल्या उत्कृष्ट षटकाराला ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’ असे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 6:13 AM

Open in App

दुबई : आयसीसीने  टी-२० विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्ध   भारताच्या सलामी लढतीत विराट कोहलीने वेगवान गोलंदाज हॅरिस रौफच्या चेंडूवर मारलेल्या उत्कृष्ट षटकाराला ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’ असे म्हटले आहे.

भारतीय संघ विश्वचषकात आपल्या लौकिकानुसार खेळला नाही. उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून दहा गड्यांनी दारुण पराभव झाला. तथापि, स्पर्धेदरम्यान दिग्गज खेळाडूंनी शानदार कामगिरी करीत लक्ष वेधले.  भारताने पाकविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अखेरच्या षटकात अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला.  हा सामना चाहत्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील.

भारत पराभवाच्या उंबरठ्यावर असताना विराटने निर्णायकक्षणी  स्वत:चा ‘दम’ सिद्ध केला. त्याने पाकिस्तानच्या हातातून विजय हिसकावला. आपल्या खेळीत विराटने असा फटका खेळला की, ज्याची दखल क्रिकेटतज्ज्ञांसोबतच आयसीसीला देखील घ्यावी लागली. पाकने त्या सामन्यात आधी फलंदाजी करीत २० षटकांत ८ बाद १५९ धावा उभारल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचे तीन फलंदाज लवकर बाद झाले. विराट- हार्दिक पांड्याने मोठी भागीदारी करीत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले होते. कोहलीने त्या सामन्यात ५३ चेंडूत नाबाद ८२ धावा ठोकून विजय साकारला.

हॅरिस रौफला ठोकला होता अप्रतिम षटकार अखेरच्या तीन षटकांत भारताला ४८ धावांची गरज होती. कोहलीने आधी शाहीनला टार्गेट केले. त्याच्या १८ व्या षटकात १७ धावा वसूल केल्या.  १९ वे षटक टाकणाऱ्या रौफला कोहलीने ‘सळो की पळो’ करून सोडले. रौफने सुरुवातीच्या चार चेंडूंवर कमी धावा दिल्या. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर विराटने दोन षटकार खेचून विराटने सामना भारताच्या बाजूने झुकवला. पाचव्या चेंडूवर विराटने अगदी समोरच्या बाजूने  षटकार खेचला. चेंडू संथ आणि आखूड टप्प्याचा होता. कोहलीने त्यावर कौशल्य पणाला लावून थेट समोरच्या बाजूने उंच षटकार मारला. 

आयसीसीने आपल्या संकेतस्थळावर विश्वचषकातील ज्या पाच ‘टर्निंग पॉइंट’चा उल्लेख केला त्यात  विराटचा पराक्रमही आहे. आयसीसीने रौफच्या पाचव्या चेंडूवरील षटकाराला विशेष स्थान दिले. आयसीसीने लिहिले,‘सामन्यातील परिस्थिती पाहता हा षटकार अविस्मरणीय असाच होता. ‘बेस्ट टी-२० शॉट ऑफ ऑल टाइम’!

टॅग्स :विराट कोहलीआयसीसीट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App