भारतीय संघाचा स्टार बॅटर विराट कोहली हा सध्या एका एका धावेसाठी संघर्ष करताना दिसतोय. कानपूर कसोटीमध्ये तो पहिल्या कसोटी सामन्यातील उणीव भरून काढत दमदार कमबॅक करेल, अशी चाहत्यांना आस आहे. पण नेट प्रॅक्टिसमध्ये जे चित्र दिसलं ते काही वेगळेच होते. दुसऱ्या कसोटी सामन्याआधी नेट प्रॅक्टिसमध्येही विराट कोहलीला नीट खेळता आले नाही. तो जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीसह फिरकीपटूंचा सामना करताना संघर्ष करताना दिसला. ही गोष्ट किंग कोहलीसह त्याच्या चाहत्यांना टेन्शन देणारी आहे.
वर्षातील पहिल्या कसोटी सामन्यात छाप सोडण्यात ठरला अपयशी
चेन्नईतील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहली ६ झावा करून माघारी फिरला होता. दुसऱ्या डावात त्याने दुहेरी आकडा गाठला. पण १७ धावांवरच यावेळी त्याचा खेळ खल्लास झाला. वैयक्तिक कारणास्तव इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेला अनुपस्थितीत राहिल्यानंतर चेन्नईच्या मैदानात विराट कोहली यंदाच्या वर्षातील पहिला कसोटी सामना खेळला. पण त्याला या सामन्यात काही छाप सोडता नव्हती.
आता ग्रीन पार्कच्या मैदानात नेट प्रॅक्टिसवेळी संघर्ष
चेन्नईच्या मैदानातील अपयशानंतर किंग कोहली ड्रेसिंग रूममध्ये न बसता नेटमध्ये प्रॅक्टिस करतानाचा व्हिडिओही समोर आला होता. धावा करण्यासाठी त्याची व्याकूळता त्यात दिसली. पण कानपूर कसोटीसाठी आधी ग्रीन पार्क स्टेडियमच्या नेट प्रॅक्टिस वेळीही त्याचा सर्वोत्तम दर्जा काही दिसला नाही. जलदगती गोलंदाजीसह फिरकीसमोरही तो अडखळत खेळताना दिसला. ही गोष्ट सध्या चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.
बुमराहनं चार वेळा केलं आउट, कोहलीनंही केलं मान्य
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, विराट कोहलीनं नेट्समध्ये बुमराहच्या १५ चेंडूचा सामना केला. त्यात तो चार वेळा आउट झाला. बुमराहचा एक चेंडू त्याच्या पॅडवरही आदळला. यावेळी जलगती गोलंदाजाने कोहली अगदी स्टंपच्या समोर असल्याचे ओरडला. जे कोहलीनंही मान्य केले. त्यानंतर दोन चेंडू बॅटची कड घेऊन गेले. बुमराहनं मिडल अँण्ड लेग स्टंपवर टाकेलल्या चेंडू विराटच्या बॅटला लागून त्याच्या अगदी जवळच पडला. यावेळी बुमराहाने शेवटचा तर शॉर्ट लेगचा कॅच आहे, असे म्हटले.” यावर कोहलीनंही ते मान्य केलं.
अक्षर पटेलनं तर त्रिफळाच उडवला
बुमराहच्या गोलंदाजीचा सामना केल्यावर कोहली दुसऱ्या नेट्समध्ये गेला. तिथं त्याने रविचंद्रन अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेलच्या गोलंदाजीचा सामना केला. इथंही त्याचा संघर्ष कायम राहिला. जडेजाच्या गोलंदाजीवर त्याने इन साइड आउट शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण तीन वेळा तो त्यात अपयशी ठरला. एवढेच नाही तर अक्षर पटेलनं त्याला बोल्ड केले. हा त्याचा नेट प्रॅक्टिसमधील शेवटचा चेंडू ठरला. कारण त्यानंतर शुबमन गिल बॅटिंगला आला.