सचिन कोरडे (पणजी) : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सोमवारी गोव्यात होता. तो गोव्यात दाखल होणार याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. विराट हा एफसी गोवा या आयएसएल मधील फ्रेन्चायझीचा सहमालक आहे. त्यामुळे त्याच्या हस्ते एफसी गोवाच्या जसीर्चे अनावरण करण्यात आले. ऐनवेळी विराटच्या आगमनाची घोषणा ऐकून मैदानावरील फुटबॉल चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. अखेर तो नेव्ही ब्ल्यू रंगाच्या जॅकेटमध्येमैदानात उतरला. जर्सी अनावरण कार्यक्रमानंतर मैदानाबाहेर शेकडो चाहते मोबाइलमध्ये छबी टिपण्यासाठी त्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, सुरक्षेच्या जाळ्यात विराट काही मिनिटांत निघून गेला. त्याने कुणालाही दाद दिली नाही. त्यामुळे चाहत्यांची मात्र निराशा झाली. बांबोळी येथील अॅथलेटिक्स स्टेडियमवर एफसी गोवाच्या जसीर्चे अनावरण करण्यात आले. या वेळी एफसी गोवाचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होणार होता, मात्र विराटच्या प्रतीक्षेत आयोजक होते त्यामुळे कार्यक्रम दोन तास उशिराने सुरू झाला. विराटच्या हस्ते जर्सी अनावरण करण्यात येईल, याबाबत प्रसिद्धी माध्यमांनाही कळविण्यात आले नव्हते. त्याची गुप्तता पाळण्यात आली. विराटची अचानक एन्ट्री फुटबॉल चाहत्यांची सुखद ठरली तर काहींना निराशा देणारी. दोन तासांपासून एक मुलगी विराटच्या ऑटोग्राफसाठी ये-जा करीत होती, मात्र तिच्या हाकेला विराटने दाद दिली नाही.
खेळ कोणताही असो; निष्ठा महत्त्वाची भारतात आजही क्रिकेट लोकप्रिय आहे. क्रिकेटच्या या देशात फुटबॉलने आपले स्थान राखून ठेवले आहे. मैदानावर चाहत्यांची होणारी गर्दी हे त्याचे उदाहरण आहे. गोवा आणि फुटबॉलचे नाते खूप घनिष्ठ आहे. त्यामुळे गेल्या पाच सत्रांपासून मी या संघासोबत आहे. खेळ कोणताही असो, त्याप्रती निष्ठा महत्त्वाची असते. मेहनत, सराव आणि जिद्दा याशिवाय यश मिळवता येत नाही. मात्र, हे करीत असताना निकालाची चिंता करायची नाही, असा महामंत्र विराटने एफसी गोवा संघातील खेळाडूंना दिला. अनावरणप्रसंगी मंचावरील खेळाडूंकडे बोट दाखवून तो बोलत होता. विराटने एफसी गोवाचे प्रशिक्षक सर्जिओ रिबेरो आणि फ्रेन्चायझीच्या ह्यग्रासरूटह्ण उपक्रमाचे कौतुक केले.