भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या सामन्यात पाहुण्यांनी दणदणीत विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. भारतानं प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 170 धावा केल्या. टीम इंडियाच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा उचलताना विंडीजनं हा सामना 8 विकेट्सनं जिंकला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनं अफलातून झेल घेतला आणि त्याचीच चर्चा रंगली. इंडियन प्रीमिअर लीगमधील चेन्नई सुपर किंग्स संघानं कोहलीच्या या 'सुपर' झेलचं श्रेय रवींद्र जडेजाला दिलं. पण, का चला जाणून घेऊया...
या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर आणि रिषभ पंत यांनी झेल सोडले. तेच टीम इंडियाला महागात पडले. लेंडल सिमन्सनं अर्धशतकी खेळी करताना विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. निकोलस पूरण, शिमरोन हेटमायर आणि एव्हिन लुइस यांनीही तुफान फटकेबाजी केली. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. शिवम दुबेनं पहिलं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमधील अर्धशतक झळकावताना आजचा दिवस गाजवला आणि त्यामुळे भारताला समाधानकारक पल्ला गाठता आला. भारताने 20 षटकांत 7 बाद 170 धावांपर्यंत मजल मारली. शिवमने 30 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार खेचून 54 धावा चोपल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना लेंडल सिमन्स आणि एव्हिन लुइस यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. पाचव्या षटकात सिमन्सचा झेल वॉशिंग्टन सुंदरनं सोडला. भुवनेश्वर कुमारच्या त्याच षटकात लुइसचा झेल रिषभ पंतकडून सुटला. हा झेल थोडासा अवघड होता, परंतु रिषभनं पुरेपूर प्रयत्न केले. लुइस 35 चेंडूंत 3 चौकार व 3 षटकार खेचून 40 धावांत तंबूत परतला. त्यानंतर आलेल्या शिमरोन हेटमारयनं फटकेबाजी केली. त्यानं रवींद्र जडेजाच्या एका षटकात सलग दोन षटकार खेचले, परंतु तिसरा षटकार खेचण्याच्या नादात तो झेल देऊन माघारी परतला. विराटनं सुपर डाईव्ह मारताना त्याचा अप्रतिम झेल टिपला.