- अयाझ मेमन/>पहिल्या कसोटीत भारत विजयाच्या जवळ जाणार असे दिसत असताना, बेन स्टोक्सच्या एका स्पेलने सगळे चित्र बदलले. स्टोक्सची गोलंदाजी शानदारच होती, त्यात वाद नाही. त्याने भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले, पण माझ्या मते कोणाची तक्रार करायची असेल, तर ती भारतीय फलंदाजीची तक्रार करावी लागेल. एक विराट कोहलीचा अपवाद वगळला, तर संपूर्ण फलंदाजी अपयशी ठरली आहे. शिखर धवन, मुरली विजय, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक हे काहीच छाप पाडू शकले नाहीत. त्यात हार्दिक पांड्या भारताचा दुसरा सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. जर तुमची फलंदाजी इतकी कमजोर असेल, तर संघ सामना कसा जिंकेल? सामना नक्कीच अटीतटीचा झाला. यामध्ये काहीही होऊ शकत होते आणि वेगळा निकाल लागण्यासाठी कोहलीसह आणखी एक फलंदाज टिकून राहणे आवश्यक होते, जे झाले नाही.सामन्यात दोन्ही संघांकडून झेल सुटले. विराट कोहलीला २१ धावांवर जीवदान मिळाले. जर तो झेल सुटला नसता, तर सामना खूप लवकर संपला असता. त्यामुळे माझ्यामते दोन्ही संघांचे झेल घेण्याचे कौशल्य अत्यंत निराशाजनक होते. यामध्ये नक्कीच सॅम कुरनने सोडलेला झेल नक्कीच निर्णायक ठरला. आपले गोलंदाज वर्चस्व गाजवत होते. अश्विनने बळी घेतले, इशांत चांगल्या फॉर्ममध्ये होता. अशा परिस्थितीमध्ये २० वर्षीय कुरनने अत्यंत परिपक्व खेळी करत, ६३ धावा केल्या आणि इंग्लंडला २००च्या जवळपास आघाडी मिळवून दिली. यामुळेच इंग्लंडने विजय मिळविला. याच कामगिरीमुळे कुरनला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने गोलंदाजीत नक्कीच छाप पाडली, पण फलंदाजीत जी चिकाटी दाखविली, ते कौतुकास्पद आहे.आता संघात बदल करण्याची गरज दिसत आहे. विजय, धवन, कार्तिक, रहाणे हे सर्व खेळाडू आमच्याकडे परदेशी मैदानांवर खेळण्याचा अनुभव नसल्याचे कारण देऊ शकत नाही. हे फलंदाज गेल्या वेळच्या दौऱ्यातही होते. त्यामुळे आता प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांना सक्तीने कठोर निर्णय घ्यावे लागतील. असे नाही की पूर्ण संघच बदलण्यात यावा, पण कुठेतरी खेळाडूंपर्यंत एक संदेश पोहोचणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीमध्ये माझे ठाम मत आहे की, आता चेतेश्वर पुजाराचा गांभीर्याने विचार होऊ शकतो. पण गेल्या काही सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म घसरला होता. भारताकडे हार्दिक व आश्विनला वगळून ६-७ फलंदाज आहेत. बेंचवर आहेत पुजारा, करुण नायर व रिषभ पंत. त्यामुळे धावा काढणारे फलंदाज निवडण्याचे लक्ष्य आहे. माझ्या मते पुजाराचा क्रमांक लागू शकतो, पण त्याला कौंटी क्रिकेटमध्ये अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. त्याला संधी मिळाली, तर त्याच्याकडूनही मोठी अपेक्षा असेल.भारतासाठी गोलंदाजांनी लक्षवेधी कामगिरी केली. गेल्या पाच सामन्यांत गोलंदाजांनी १०० बळी घेतले. म्हणजे प्रत्येक वेळी भारतीयांनी संपूर्ण संघ बाद केला आहे. अफगाणिस्तानविरुद्ध सहज जिंकले. कारण तो अत्यंत कमजोर संघ आहे, पण द. आफ्रिकेविरुद्ध ६०, तर इंग्लंडविरुद्ध २० बळी घेतले. त्यामुळचे सध्या भारतासाठी गोलंदाजी मजबूत तर फलंदाजी कमजोरी ठरत आहे.>विराट कोहली आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी आला आहे. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकर नंतरचा केवळ दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. मी क्रमवारीला फार महत्त्व देत नाही. कारण सध्या सहाव्या स्थानी असलेल्या चेतेश्वर पुजाराला पहिल्या सामन्यात संघात स्थान मिळाले नव्हते, पण सध्या कोहली, स्टीव्ह स्मिथ, जो रुट आणि केन विलियम्सन या क्रमवारीतील अव्वल चार फलंदाजांमध्ये येत्या काही ७-८ वर्षांमध्ये मोठी स्पर्धा पाहण्यास मिळेल हे नक्की.(संपादकीय सल्लागार)