नेतृत्वाच्या मुद्यावरून बीसीसीआयसोबतचे मतभेद चव्हाट्यावर आणण्याचे विराट कोहलीचे ‘टायमिंग’ चुकले. मोठ्या दौऱ्याआधी कुणावरही दोषारोप करणे योग्य नाही. यामुळे द. आफ्रिका दौऱ्याआधी अनावश्यक वादाला तोंड फुटल्याची खंत विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव यांनी गुरुवारी व्यक्त केली. द. आफ्रिकेकडे रवाना होण्याआधी मुंबईत पत्रकार परिषदेत कोहलीने सौरव गांगुली यांचे बोर्डाने मला टी-२० ने नेतृत्व सोडू नकोस असे समजावल्याचे वृत्त चुकीचे असल्याचा खुलासा केला होता. याच वक्तव्यावरून बीसीसीआय आणि कोहली यांच्यात तणाव असल्याचे स्पष्ट झाले होते.
या पाश्वभूमीवर एबीपी न्यूजशी बोलताना कपिल म्हणाले, ‘ही वेळ कुणावर दोषारोप करण्याची नाही. द. आफ्रिकेचा मोठा दौरा आहे. त्याकडे लक्ष द्यायला हवे. बोर्ड अध्यक्ष काय बोलले ते बाजुला ठेवा, मात्र भारतीय संघाच्या कर्णधाराला देखील तितकाच सन्मान असतो. एकमेकांबद्दल सार्वजनिकरित्या उठसूट खराब भाष्य करणे योग्य नाही मग तो कोहली असो वा गांगुली.’
भारताला १९८३ चा वन-डे विश्वचषक जिंकून देणारे कपिल पुढे म्हणाले, ‘कोहलीने परिस्थिती आणि स्वत:वर नियंत्रण राखून देशाचा विचार करायला हवा. विराटने देशहित सर्वतोपरी मानावे असे मी त्याला आवाहन करेन. जे चुकीचे असेल ते पुढे येईलच पण मोठ्या दौऱ्याआधी वाद निर्माण करणे योग्य नाही.’