नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ज्याप्रकारे मैदानात आणि मैदानाबाहेर प्रगती करत आहे त्यावर आपण समाधानी असल्याचं प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं म्हणणं आहे. विराट कोहली एक फलंदाज आणि व्यक्ती म्हणून ज्याप्रकारे प्रगती करत आहे त्याचा संघावर सकारात्मक परिणाम होत असल्याचं ते म्हणाले आहे. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना रवी शास्त्री यांनी आपली आणि विराट कोहलीची तुलना होणं आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक सामना जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरण्याची आमची भूमिका सारखीच असल्याने एकमेकांसोबत काम करताना आम्हाला समस्या जाणवत नाहीत.
'आमचं समीकरण चांगलं जुळतं. आमच्या दोघांचंही व्यक्तिमत्व सारखं आहे. आमच्या नात्यात विश्वास हा मुख्य घटक आहे. आम्ही दोघेही कणखर आहोत, आणि कोणताही सामना जिंकण्याच्या उद्देशानेच मैदानात उतरतो. आम्ही जिंकण्यासाठी खेळतो. आम्ही टाईमपास करण्यासाठी जात नाही', असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. रवी शास्त्री यांनी 80 कसोटी सामने आणि 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत. पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, 'हा संघ फक्त नंबर भरण्यासाठी नाहीये. आम्हाला स्पर्धा करायची आहे. आम्हाला खेळ पुढे घेऊन जायचा आहे. विराट कोहली आपल्या स्वभावाप्रमाणे वागतो. त्याच्यासोबत असताना जे तुम्हाला दिसतंय तेच मिळणार'.
रवी शास्त्री यांनी आपल्या आणि विराट कोहलीच्या विचारपद्धतीत अंतर असल्याचंही मान्य केलं आहे. पण यामुळे आपल्यात कधी वाद झालं नसल्याचंही त्यांनी सांगितलं. 'हीच चर्चा करण्याची पद्दत आहे. दिवसाच्या शेवटी कॅप्टन हाच बॉस आहे. तो मला सल्ला विचारु शकतो. पण याचा अर्थ त्याने तो सल्ला ऐकलाच पाहिजे असं काही नाही. कारण त्याने स्वत: विचार करावा आणि निर्णय घ्यावा असंच मला वाटतं. आम्ही सपोर्ट स्टाफमध्ये असल्या कारणाने सल्ला देणं आमचं काम आहे, ज्यामुळे काही मदत होऊ शकते', असं रवी शास्त्री यांनी सांगितलं.
'विराट कोहली अजून 29 वर्षाचा आहे. तो तरुण आहे, अजून सात ते आठ वर्ष तो सहज खेळू शकतो. याचा अर्थ अजून किमान सहा वर्ष तरी तो कर्णधार म्हणून मैदानावर उतरु शकतो. त्याच्यामध्ये शांतपणे विचार करण्याची ताकद आहे, जे संघाच्या दृष्टीकोनातून फायद्याचं आहे. कारण कर्णधार म्हणून तो तुमचा चेहरा असतो, त्यामुळे त्याने कणखर असावं ही अपेक्षा असणं साहजिक आहे', असं रवी शास्त्री म्हणाले आहेत.