Yuvraj Singh advice to Virat Kohli : भारतीय संघाचा आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा फॉर्म काही त्याची साथ देताना दिसत नाही. कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर विराट आणखी मोकळेपणाने खेळेल, असे वाटले होते. पण, त्यानंतरही विराटची बॅट रुसलेलीच आहे. दोन-अडिच वर्षात विराटला एकही आंतरराष्ट्रीय शतक झळकावता आलेले नाही. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधील १०० डाव झाले, तरीही विराटची शतकाची प्रतीक्षा काही संपताना दिसत नाही. आयपीएल २०२२मध्ये सलग दोन गोल्डन डकनंतर परवाच्या सामन्यात विराट ९ धावांवर बाद झाला. त्यामुळे चाहते प्रचंड निराश आहेत. अशात माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला आयपीएलमधून माघार घेण्याचा सल्ला दिला आहे.
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानेही विराटला सल्ला दिला. विराटने त्याचे सुरुवातीचे दिवस आठवायला हवेत आणि त्यातून सध्याच्या खराब फॉर्मावर कशी मात करावी, यावर तोडगा काढायला हवा. Sports18 या नव्याने आलेल्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत युवीने त्याचे मत मांडले. मागील १५ वर्षांत मी पाहिलेल्या खेळाडूंमध्ये विराटची मेहनत घेण्याची क्षमता ही इतरांपेक्षा चौपट चांगली असल्याचेही युवी म्हणाला. तिच त्याला मदत करेल.
युवराज म्हणाला, साहजिकच, तो देखील आनंदी नाही आणि लोकही आनंदी नाहीत, कारण आपण त्याला मोठे विक्रम करताना पाहिले आहे. शतकानंतर शतकं त्याने केले आहेत. असा बॅड पॅच सर्वोत्तम खेळाडूच्या वाट्याला येतोच. विराटने पुन्हा एकदा मुक्तपणे खेळायला हवं. जर त्याने स्वतःत बदल केला आणि पूर्वी होता तसा तो खेळला, तर तो नक्कीच धावांचा पाऊस पाडेल. या युगातील तोच सर्वोत्तम खेळाडू आहे, हे तो पुन्हा सिद्ध करून दाखवेल.
Web Title: 'Virat needs to become a free-flowing personality again': Yuvraj Singh's advice for Kohli to get his form back
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.