नितीन गावणेकर
मडगाव : नुकताच दक्षिण अफ्रिकेचा दौरा यशस्वी करून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने फुटबॉलच्या सामन्याला हजेरी लावली. गोव्यातील मडगावच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ‘तो’ येणार म्हणून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. त्याची एक झलक टिपण्यासाठी मैदानावर मोठी गर्दी केली होती. त्याच्या ‘विराट’ दर्शनाने फुटबॉलच्या मैदानावर क्रीडाप्रेमींना मोठा दिलासा मिळाला. जवळपास दोन वर्षांनतर तो फुटबॉलच्या सामन्यासाठी गोव्यात आला. विराट हा एफसी गोवा संघाचा सहमालक आहे.
आयएसएल स्पर्धेतील एटिके कोलकाताविरुद्धचा सामना एफसी गोवासाठी अत्यंत महत्त्वाचा असा होता. या सामन्यासाठी विराटने उपस्थिती लावली. प्रदीर्घ काळानंतर त्याने प्रथमच आपल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी फातोर्डा येथील मैदानावर उपस्थिती लावली. त्याआधी, त्याने पत्रकारांशी संवाद साधला. तोे म्हणाला, फुटबॉल हा खेळ गोव्याच्या संस्कृतीचा एक भाग आहे. फुटबॉल आणि गोव्याचे अतूट नाते असून या संघाचा सहभागीदार असल्याचा मला अभिमान आहे. आपल्या कारकिर्दीच्या यशाला उजाळा देताना विराटने अनेक आठवणी सांगितल्या. तो म्हणाला, मी बालपणीच क्रिकेट खेळाला सुरुवात केली होती. प्रत्येक टप्प्यातून मार्गक्रमण करत गेलो. यश मिळविण्यासाठी कुठेतरी सुरुवात करायला पाहिजे. मोठ्या यशाचा पाठलाग करण्यासाठी मार्गक्रमण करावे लागते. तसा प्रवास सुरूच आहे. भारताचे क्रीडा जगत उंचावण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित करावे. मुलांच्या आवडीनिवडी लक्षात घ्याव्यात. त्यांची दिशा ओळखून त्यांना संधी देण्याचा प्रयत्न करावा, असा संदेशही त्याने दिला.
दरम्यान, दक्षिण अफ्रिका दौºयात भारतीय क्रिकेट संघाने विराटच्या नेतृत्वाखाली टी-२० व एकदिवशसीय मालिका जिंकली. मात्र, कसोटी मालिकेत त्यांना मात खावी लागली होती. श्रीलंकेच्या दौºयात विराटला विश्रांती देण्यात आली असून कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे देण्यात आली आहे.