जोहान्सबर्ग - केप टाऊन आणि सेंच्युरिअन कसोटी पाठोपाठ जोहान्सबर्ग कसोटीतही भारताच्या फंलदाजांनी नांगी टाकली. कगिसो रबाडा, वर्नेन फिलँडर आणि अन्य आफ्रिकन गोलंदाजांच्या जलद माऱ्यासमोत भारतीय संघ 187 धावांमध्ये ढेपाळला. पहिल्या दिवसातील दहा षटकांचा खेळ अद्याप बाकी असून शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भुवनेश्वरनं आफ्रिकेला पहिला धक्का दिला होता. मार्कमरला भुवनेश्वरनं पार्थिवकरवी दोन धावांवर झेलबाद केलं होतं.
कर्णधार विराट कोहली (54), चेतेश्वर पुजारा(50) यांनी संयमी अर्धशतकी खेळी करुन भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ठराविक अंतराने विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा माघारी परतल्यानंतर भारतीय डावाची पुन्हा एकदा घसरगुंडी उडाली. अखेरच्या फळीत भुवनेश्वर कुमारने(30) फटकेबाजी करत धावसंख्येत भर टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर फलंदाजांकडून त्याला हवीतशी मदत मिळाली नाही. अखेर भारताचा पहिला डाव 187 धावांमध्ये आटोपला.
अजिंक्य रहाणे, मुरली विजय, लोकेश राहुल, पार्थिव पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी साफ निराश केलं. एकवेळ भारताची तीन बाद 144 धावा अशी सन्मानजनक परिस्थिती होती. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माऱ्यापुढे भारताचे शिलेदारानी ठरावीक अंतरांनी आपले विकेट बहाल केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून कगिसो रबाडाने सर्वाधित 3 बळी मिळवले. तर मॉर्ने मॉर्कल, वर्नेन फिलँडर आणि फेलुक्वायोने प्रत्येकी 2-2 बळी मिळवले. तर लुंगी निगडीने एक बळी मिळवला.
तीन कसोटी सामन्यांची मालिका भारताने 0-2 अशी गमावली आहे. प्रतिष्ठा वाचवण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरला आहे. विराटनं अंतिम 11 मध्ये दोन बदल केले आहेत. यामध्ये त्यानं पहिल्या दोन सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहितला डच्चू देताना त्याच्या जागी अजिंक्य रहाणेला संधी दिली आहे. त्याचप्रमाणे फिरकी गोलंदाज अश्विनच्या जागी भुवनेश्वर कुमारला स्थान देण्यात आले आहे. भारतीय कसोटी संघात पाच वेगवाग गोलंदाजासह खेळण्याचा निर्णय विराट कोहलीनं घेतला. सहा वर्षानंतर हे पहिल्यांदाच असं घडलं आहे की संघात एकही फिरकी गोलंदाज नाही. यापूर्वी 2011-12ला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना माजी कर्णधार एम.एस धोनीनं पर्थ कसोटीमध्ये भारतीय संघात एकही फिरकी गोलंदाज खेळवला नव्हता. यावेळी ऑस्ट्रेलियानं भारतावर एक डाव आणि 37 धावानी विजय मिळवला होता.
विराटच्या नावावर नकोसा विक्रम - कसोटी कर्णधार म्हणून विराटचा हा ३५वा सामना आहे. परंतु कोणत्याही दोन सलग सामन्यात विराट आजपर्यंत कधीही सारखाच संघ घेऊन मैदानात उतरलेला नाही. त्याने 35 कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या सामन्यात संघात एकतरी बदल केलेला आहे. यापूर्वी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता. गांगुलीने कसोटी कर्णधार झाल्यानंतर सलग 28 कसोटीत सलग दोन सामन्यात कधीही सारखाच संघ मैदानात उतरवला नव्हता. जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये ग्रॅम स्मिथने तब्बल 44 सामन्यात संघात बदल केला होता.