मुंबई - आशिया चषक स्पर्धेत रविवारी होणाऱ्या लढतीत भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार आहे. मात्र पाकिस्तानविरुद्धच्या लढतीसाठी अंतिम एकादश निवडणे कर्णधार रोहित शर्माची कसोटी घेणारे ठरणार आहे. लोकेश राहुल आणि विराट कोहली पुनरागमन करणार असल्याने संघामध्ये फेरबदल निश्चित आहेत. अशा परिस्थितीत कुठल्या खेळाडूंना संधी मिळेल हे पाहण्यासारखे ठरणार आहे.
गतवर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकामध्ये भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागला होता. तो पराभव टीम इंडिया विसरलेली नाही. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय संघाने आपला शेवटचा टी-२० सामना ७ ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्या सामन्यात खेळलेल्या ५ खेळाडूंना आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात स्थान मिळालेले नाही.
विराट कोहली सातत्याने तिसऱ्या क्रमांकावर चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर संधी मिळू शकते. तर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादवला संधी मिळू शकते. त्यानंतर रिषभ पंत आणि दिनेश कार्तिक यांना संधी मिळू शकते. म्हणजेच दीपक हुडाचा संघातील समावेश अनिश्चत आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांना संधी मिळू शकते.
भारताचा अंतिम संघ असा असू शकतोरोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार