बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघातील खेळाडू दोन गटात ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहेत. १० नोव्हेंबरला काही खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे फ्लाइट पकडले. त्यानंतर ११ नोव्हेंबरला उर्वरित खेळाडू बहुप्रतिक्षित दौऱ्यासाठी उड्डान भरणार आहेत. विराट कोहली या दोन्ही गटात सामील न होता स्वत: सर्वात आधी ऑस्ट्रेलियाला पोहचल्याचे पाहायला मिळाले. कोहली शनिवारी मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी अनुष्का आणि मुलेही होती. विराट कोहली रविवारी संध्याकाळीच ऑस्ट्रेलिया पोहचल्याची माहिती समोर येत आहे. दोन गटात भारतीय संघातील खेळाडू पोहचणार ऑस्ट्रेलियाला, त्याआधी विराट तिथं पोहचला
टाइम्स ऑफ इंडियानं विश्वसनीय सूत्रांच्या हवाले दिलेल्या वृत्तानुसार, विराट कोहली अन्य खेळाडूंच्या आधीच पर्थला पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी एक बॅच आधीच रवाना झाली असून सोमवारी दुसरी बॅचही फ्लाइट पकडणार आहे. १० नोव्हेंबरला रवाना झालेल्या खेळाडू सोमावरी दुपारी ऑस्ट्रेलियात पोहचतील. दुसरीकडे ११ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणाऱ्या खेळाडूंचा ताफा मंगळवारी दुपारपर्यंत ऑस्ट्रेलियात दाखल होईल. २२ नोव्हेंबरला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे.
रोहित शर्मा कधी अन् कसा येणार ते गुलदस्त्यातच
एका बाजूला विराट कोहलीनं संघातील इतर खेळाडूंसोबत जाण्यापेक्षा फॅमिलीसोबत ऑस्ट्रेलियाला रवाना होणं पसंत केल्याचे दिसून येते. दुसऱ्या बाजूला रोहित शर्मा संघातील खेळाडूंसोबत जाणार का? ही गोष्ट गुलदस्त्यातच आहे. रोहित शर्मा दुसऱ्यांदा बाबा होणार असल्यामुळे तो ऑस्ट्रेलियातील काही कसोटी सामन्याला मुकू शकतो. या परिस्थितीत जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करेल, ही गोष्ट कोच गौतम गंभीर याने स्पष्ट केली आहे. पण रोहित संघाला नंतर जॉईन होणार की संघासोबत पोहचून पुन्हा मायदेशी परतणार ही गोष्ट काही स्पष्ट झालेली नाही.
विराट कोहलीवर असतील नजरा
ऑस्ट्रेलिया दौरा भारतीय संघासाठी खूपच चॅलेंजिग असेल. घरच्या मैदानात न्यूझीलंडकडून ३-० असा पराभव झाल्यामुळे टीम इंडियाचा वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचा मार्ग खडतर झाला आहे. भारतीय संघाला दमदार कमबॅक करायचं असेल तर विराट कोहलीच्या भात्यातून मोठी खेळी येणं गरजेचे आहे. घरच्या मैदानातील बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसह न्यूझीलंडविरुद्धही त्याला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. ऑस्ट्रेलियन मैदानात दिमाखात कमबॅक करण्याचे एक वेगळे चॅलेंज त्याच्यासमोर असेल.