मतीन खान, स्पोर्ट्स हेड-सहायक उपाध्यक्ष लोकमत पत्रसमूह.विराट कोहली- रोहित शर्मा यांना वास्तवाचे भान झाले असावे. रविवारी वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबादच्या पहिल्या लढतीदरम्यान उभयतांमध्ये झालेले मनोमिलन पाहून चाहत्यांना आनंद झाला. हट्टवादी भूमिका कुणालाही परवडणारी नसते. दोन्ही खेळाडूंनी अहंकाराला मूठमाती देत मैत्रीचा मार्ग निवडल्याचे दिसते. सामन्यात पोलार्ड बाद होताच कोहली- रोहित यांनी ‘हाय-फाय’ अंदाजात जल्लोष केला. हे पाहून दोघांमध्ये आता कुठल्याही प्रकारची कटुता नसल्याची खात्री पटली. मैदानावर समन्वय आणि वैयक्तिक संबंध सुधारण्याचे संकेत मिळाले. सामन्यात विराट रोहितला सल्ला देताना दिसला. एकवेळ डीआरएस घेण्याची वेळ येताच रोहितने यष्टीरक्षक पंतच्या सल्ल्याकडे लक्ष न देता कोहलीचा शब्द मनावर घेतला. हे पाहून दोघांच्या नात्यांमधील ‘मीपणा’ आता हळूहळू नाहीसा होताना दिसतो. विराट-रोहित यांच्यात मधूर संबंध असणे भारतीय क्रिकेटसाठी किती महत्त्वपूर्ण आहे, हे सोबतच्या चार्टमधून दृष्टीस पडेल. आणखी एक हृदयस्पर्शी पैलू असा की, ज्या पद्धतीने भारतीय १९ वर्षांखालील संघाने नव्या युगाला प्रारंभ केला, त्या युवा खेळाडूंसाठी विराट-रोहित यांचे मनोमिलन प्रेरणादायी ठरू शकेल. यश धूल असो वा शेख राशिद किंवा राज बावा, या सर्वांसाठी विराट-रोहित यांच्या नात्यातील गोडवा ड्रेसिंग रूममधील माहोल चांगला असणे किती गरजेचे आहे, असा संदेश देणारा ठरतो. विजयी जल्लोषात सहभागी होणारा आणि पराभवानंतरही खांद्यावर डोके ठेवून खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा, तो खरा मित्र असतो.भारतीय क्रिकेटमधील मतभेद नवे नाहीत. विकोपानंतर विराट-रोहितसारखे नात्यातील सख्य अभावानेच पाहायला मिळाले. येत्या काळात भारताला अनेक सामने खेळायचे आहेत. यंदा दोघांमधील मैत्री नव्याने फुलेल, ज्या यशासाठी भारतीय क्रिकेट धडपडत आहे, त्या यशाच्या मार्गावर संघ परतेल. आपल्या देशातच नव्हे, तर विदेशातही यशोगाथा फडकविण्यात ही जोडगोळी यशस्वी होईल, अशी आशा बाळगुया...
‘अंधेरा दूर करने को एक चिराग ही काफी है, सौ चिराग जलते हैं एक चिराग जलने से!’ विराट- रोहित यांनी भारतीय क्रिकेटला जे योगदान दिले, त्यातून अनेक विजय मिळाले आहेत. दोघांनी वन-डेतील भागीदारीच्या बळावर ६४.५५ च्या सरासरीने ४९०६ धावा केल्या. दोघांची सरासरी जगातील पहिल्या दहा विविध जोड्यांच्या सरासरीत सर्वोत्कृष्ट ठरते. श्रीलंकेची जोडी दिलशान- संगकारा त्यांच्या जवळपास आहे. या श्रृंखलेत द्रविड- गांगुली या जोडीचेही नाव घेता येईल.