दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीत विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन्ही स्टार फलंदाज भारताचे अव्वल फलंदाज ठरले. मात्र, दोघांनाही एका स्थानाचा फटका बसला आहे. कोहली आठव्या, तर रोहित नवव्या स्थानी आला आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडविरुद्ध चांगली कामगिरी केलेल्या श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांनी अनुक्रमे २७वे आणि ३४वे स्थान मिळवले.
न्यूझीलंडविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतरही शिखर धवनची १५व्या स्थानी घसरण झाली. मालिकेतून विश्रांती मिळाल्यानंतरही कोहली आणि रोहित यांनी अव्वल दहामध्ये स्थान कायम राखले. श्रेयसने सहा, तर गिलने तीन स्थानांनी प्रगती केली आहे. बाबर आझम आणि इमाम-उल-हक हे पाकिस्तानचे फलंदाज पहिल्या दोन स्थानी कायम आहेत.
गोलंदाजीत दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराह १२व्या स्थानी असून त्याची दोन स्थानाने घसरण झाली. युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी २ स्थानांनी नुकसान झाले असून दोघे अनुक्रमे २३ आणि २६व्या स्थानी आहेत.
भारत चौथ्या स्थानीसांघिक क्रमवारीत भारतीय संघ ११० गुणांसह चौथ्या स्थानी आहे. न्यूझीलंड सर्वाधिक ११६ गुणांसह अव्वल असून भारताविरुद्धच्या मालिका विजयाचाही त्यांना फायदा झाला आहे. इंग्लंड (११३) आणि ऑस्ट्रेलिया (११२) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तान भारताच्या तुलनेत तीन गुणांनी मागे पाचव्या स्थानी आहे.