मुंबई : ‘ विराटसारखा अनुभवी खेळाडू गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय संघात आहे. तो ऑस्ट्रेलियात आधीही खेळला असून आगामी कसोटी मालिकेदरम्यान त्याची कमतरता नक्कीच भासणार आहे. पण हे संघाबद्दल आहे, कोण्या एका व्यक्तीबद्दल नाही. तशी माझी इच्छा नाही पण विराट जखमी झाला असता तर दुसरा सामना त्याला त्याच्याशिवायच खेळावा लागला असता. मला इतकेच सांगायचे आहे की, संघातील महत्त्वाचा खेळाडू जखमी झाल्यानंतर संघाने त्याच्याशिवाय पुढे जाऊन खेळायचे असते,’असे मत सचिन तेंडुलकर याने एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मांडले. एकदिवसीय आणि टी-२० मालिकेनंतर भारतीय संघासमोर आता कसोटी मालिकेचे आव्हान असेल. १७ डिसेंबरपासून चार सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली फक्त पहिल्या सामन्यासाठी उपलब्ध असल्याने भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. विराट कोहलीने पितृत्व रजा घेतली असून पहिल्या सामन्यानंतर तो पुन्हा भारतात परतणार आहे. सचिनने या मुलाखतीत पहिल्या सामन्यानंतर कोहलीची अनुपस्थिती, ईशांत शर्मा गोलंदाजीसाठी नसणे, नटराजनला कसोटी संघात संधी देणे आणि विशेष म्हणजे रोहितने ऑस्ट्रेलियात जावे का अशा अनेक मुद्दांवर भाष्य केले.
भारतीय संघाला विराट कोहलीची अनुपस्थिती भासणार असल्याचे सचिननेही मान्य केले. मात्र यावेळी संघ सध्या चांगली कामगिरी करत असून कोहलीच्या अनुपस्थित नवीन चेहऱ्याला संधी मिळेल याकडे लक्ष वेधले. तो म्हणाला,‘ मला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामना आठवतो. अनिल कुंबळे जखमी झाला होता आणि त्यानंतर आम्ही त्याच्याशिवाय खेळलो होतो. त्यावेळी अनिल आमचा मुख्य गोलंदाज होता. त्यामुळे अशी आव्हाने येत असतात. आपण त्यासाठी तयार असायला हवे. ’
संघात अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. एखाद्या नव्या खेळाडूकडे मैदानात जाऊन देशासाठी काही तरी कऱण्याची संधी चालून येणार आहे. विराट तिथे असता तर संधी मिळाली नसती.’
रोहित असता तर फायदा झाला असता का असे विचारताच सचिनने सांगितलं की,‘मला रोहितच्या फिटनेसबद्दल कल्पना नाही. हे बीसीसीआय आणि रोहितला माहीत आहे. ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. बीसीसीआय, फिजिओ आणि व्यवस्थापन याचे उत्तर देईल. रोहितने फिटनेस टेस्ट पूर्ण केली तर त्याच्यासारखा खेळाडू ऑस्ट्रेलियात असायला हवा.
Web Title: Virat should be missed, Rohit should be in Australia, Sachin Tendulkar's opinion before Test series
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.