कराची : टी-२० विश्वचषकात विराट कोहलीने मारलेले दोन षट्कार पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफ अद्याप विसरलेला नाही. विराटने मारलेल्या षट्कारांचे मला दु:ख वाटत नाही, असे हारिस म्हणाला. पाकविरुद्ध विराटने ५३ चेंडूंत ८२ धावांची खेळी केली होती. यात सहा चौकार आणि चार षट्कारांचा समावेश होता. या खेळीतील दोन अप्रतिम षट्कार विराटने हारिस रौफच्या गोलंदाजीवर मारले होते.
‘क्रिकवीक’ला दिलेल्या मुलाखतीत हारिस त्या सामन्याबद्दल भरभरून बोलला. तो म्हणाला, ‘विश्वचषकात विराट ज्या पद्धतीने खेळला, तोच त्याचा खरा दर्जा आहे. मैदानात तो कसा चौफेर फटकेबाजी करतो हे सर्वांनाच माहीत आहे. ज्या प्रकारे त्याने माझ्या चेंडूंवर षट्कार मारले, तसे कोणी मारू शकेल असे मला वाटत नाही. हार्दिक पंड्या किंवा दिनेश कार्तिकने हेच फटके मारले असते तर मला वाईट वाटले असते. पण, हे फटके विराटच्या बॅटमधून आले होते, त्यामुळे दु:ख वाटत नाही. तो त्याचा ‘क्लास’ आहे.’
सामन्याबद्दल बोलताना रौफ म्हणाला, ‘भारताला शेवटच्या १२ चेंडूंत ३१ धावांची गरज होती. मी चार चेंडूंत फक्त तीन धावा दिल्या होत्या. शेवटच्या षटकासाठी किमान २० धावा राहतील असे वाटले होते. आठ चेंडूंत २८ धावा हव्या असल्याने मी तीन चेंडू स्लो टाकले. त्यावर फलंदाज फसले. चारपैकी फक्त एकच चेंडू फास्ट टाकला. विराट इतक्या लांबून तो चेंडू फटकावेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. माझी योजना आणि अंमलबजावणीही योग्य होती; पण विराटचा तो फटका दर्जेदार होता.’